खुशखबर! मराठवाडी धरणातून वांग नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राजेश पाटील
Wednesday, 20 January 2021

मराठवाडी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता 2.73 टीएमसी असली, तरी अजून बांधकाम पूर्ण न झाल्याने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नाही.

ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणातून वांग नदीपात्रात पाणी सोडण्यास आजपासून सुरवात झाली. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन ही कार्यवाही करण्यात आली आहे. या रब्बी हंगामातील हे दुसरे आवर्तन असून, लाभक्षेत्रात कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत असलेले वांग नदीवरील सर्व बंधारे भरेपर्यंत धरणाचे गेट खुले ठेवण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. 

मराठवाडी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता 2.73 टीएमसी असली, तरी अजून बांधकाम पूर्ण न झाल्याने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नाही. गेल्या पावसाळ्यात सांडव्याच्या बांधकामानुसार 1.4 टीएमसी पाणीसाठा झालेला होता. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या आवर्तनानंतर सद्यःस्थितीस 1.2 टीएमसी पाणीसाठा उरला आहे. 

तशी वेळ आली, तर मेडिकल कॉलेजचं पण उद्घाटन करणार; उदयनराजेंचा प्रशासनाला इशारा

कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांसह टेंभू योजनेलाही येथून पाणीपुरवठा केला जातो. सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याची आवश्‍यकता विचारात घेऊन कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांच्या मार्गदर्शनानुसार जिहे-कटापूर प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचचे सहायक अभियंता एन. ए. सुतार यांनी सर्व संबंधितांना याबाबत कळविल्यानंतर सहायक अभियंता शरद पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी धरणाचे गेट उचलून नदीपात्रात दीडशे क्‍युसेकने विसर्ग सुरू केला आहे. नदीपात्रातील बंधारे भरेपर्यंत धरणाचे गेट खुले राहणार आहे. 

भाजपचे आमदारही आता खोटं बोलू लागलेत; राष्ट्रवादीच्या पवारांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Start Of Discharge Of Water From Marathwadi Dam Into Wang River Basin