
भाजपच्या आमदारांनी खोटी माहिती देत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत केले.
सातारा : जावळी तालुक्यातील निवडणूक लागलेल्या 17 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांची सत्ता आली आहे. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती या पक्षविरहीत विचाराने झाल्या आहेत. त्यातही पक्षाच्या विचाराचेच जास्त लोक असल्याने भाजपच्या आमदारांनी खोटी माहिती देत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादीच्या माध्यमातून सातारा-जावळीसाठी मोठा निधी मिळत असल्याचे लोकांना माहित आहे. त्याची प्रचिती या निवडणुकांत आल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जावलीचे नेते दीपक पवार यांनी आपली भूमिका मांडली. श्री. पवार म्हणाले, पूर्वीपासून हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. ग्रामपंचायत निकालावरून ते पुन्हा स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा - जावळी मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी आजपर्यंत दिला आहे. परंतु, तो मीच आणला असे आमदार म्हणतात. याबाबत मी अजित पवारांकडे विचारणा केली. तेव्हा ते म्हणाले, या मतदारसंघातील अनेक कामे मी सुरू केली आहेत. त्यामुळे या कामांच्या पूर्णत्वासाठी मी निधी देत असतो. या मतदारसंघाचे आमदार आमचे जुने सहकारी होते. त्यामुळे भेटायला येतात. त्यांना डावलता येत नाही, परंतु दिला जाणारा निधी हा पूर्णपणे राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच दिला जात आहे, असे
त्यांनी स्पष्ट केले आहे. सातारा-जावळीतील जनतेलाही ते माहित आहे. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीतही लोक पक्षाच्या विचाराशी प्रामाणिक राहिले आहेत.
जिल्ह्यातील टॉप टेन गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई
ग्रामपंचायत निवडणुका लागल्यावरच गावागावात तेढ निर्माण होऊ नये, गावाने विकासासाठी एकत्र यावे या विचाराने आम्ही बिनविरोध निवडणुका करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी प्रत्येक गावाच्या प्रयत्नांना साथ दिली. जावळी तालुक्यातील 75 पैकी 38 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. निवडणूक लागलेल्यांमध्येही बहुतांश गावात दोन ते चार जागांसाठीच निवडणूक लागली होती. गावे कोणत्याही पक्षाच्या विचाराने बिनविरोध झाली नाहीत. भावकी तसेच सर्वपक्षीय लोकांची सांगड घातल्यामुळेच ते शक्य झाले आहे. ते गावांचे श्रेय आहे. त्यातही बहुतांश ग्रामपंचायती या राष्ट्रवादीचा विचार मानणाऱ्याच आहेत.
गावांचा विकास करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : आमदार शिवेंद्रसिंहराजे
निवडणूक लागलेल्या 37 ग्रामपंचायतीपैकी 17 ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या निवडून आल्या आहेत. त्याध्ये धनकवडी, केसकरवाडी, मालचौंडी, निझरे, मोरावळे, काळोशी, बेलावडे, आर्डे, खर्शी, रायगाव, महामुलकरवाडी, दरे खुर्द, दरे बुद्रुक, सरताळे, सलपाने, नरफदेव, सर्जापूर अशा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या मागेच जनमताचा कौल राहिला आहे. मी व आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यासाठी प्रयत्न केले. सातारा तालुक्यातही आम्हाला यश मिळाले आहे. त्यामुळे मतदारसंघात कुणाएकाचे वर्चस्व आहे असे सांगून लोकांची दिशाभूल करणे थांबवावे असे आवाहन त्यांनी केले.
Gram Panchayat Results : पवारवाडीत पवारांचा बालेकिल्ला ढासळला; 40 वर्षांनंतर सत्तांतर
मिशन सातारा पालिका....
यापुढे आमचे लक्ष सातारा पालिका निवडणुकीकडे आहे, असे सांगून दीपक पवार म्हणाले, त्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील व समविचारी पक्षांची चर्चा करण्यास सांगितले आहे. त्या दृष्टीने आम्ही पालिका क्षेत्रात बैठका सुरू केल्या आहेत. काही नगरसेवक, कार्यकर्तेही आमच्या संपर्कात येत आहेत. भाजपचेही लोक नाराज आहेत. परंतु, सर्व पक्षांनासोबत घेऊन आम्ही निर्णय घेणार आहे. साताऱ्याचा पाहिजे असा विकास अद्याप झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या सत्तेचा लाभ सातारच्या विकासासाठी करून घेता यावा, यासाठी सातारकरांनी महाविकास आघाडीच्या मागे खंबीर उभे रहावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.
पिलीव घाटात सातारा-पंढरपूर बसवर दगडफेक; दरोड्याच्या अफवेने सातारा-सोलापूर पोलिसांची पळापळ
संपादन : बाळकृष्ण मधाळे