Marathwadi Dam : बैठक बोलवा, अन्यथा तीव्र संघर्ष; 'जनजागर'चा आक्रमक पवित्रा

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News

ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणाचे बांधकाम पूर्णत्वाकडे निघाले असतानाही धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत. "आधी पुनर्वसन मगच धरण' या कायद्याची ही पायमल्ली असून तातडीने संबंधित अधिकाऱ्यांसह धरणग्रस्त प्रतिनिधींची बैठक बोलवा, अन्यथा तीव्र संघर्ष उभारावा लागेल, असा इशारा भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या मार्गदर्शनाखालील जनजागर प्रतिष्ठानने निवेदनाव्दारे पुणे विभागीय आयुक्तांकडे दिला आहे. 

प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक देवराज देशमुख, संघटक जितेंद्र पाटील, सांगली जिल्हा समन्वयक जगन्नाथ विभूते व अन्य प्रतिनिधींनी याबाबतचे निवेदन आयुक्तांना पाठविले आहे. धरण पूर्णत्वाकडे असताना पुनर्वसनाचे काम अपूर्ण असल्याने स्थानिक धरणग्रस्तांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. मेंढमधील गावठाणासाठी धरणग्रस्त स्वमालकीची जमीन देण्यास तयार असतानाही त्यांनी केलेली भूखंड वाटपाची मागणी मान्य केली जात नाही. तीन वर्षांपासून हा गावठाण प्रश्न प्रलंबित आहे.

40 खातेदारांचा विषय मार्गी लावून तेथील नागरी सुविधा पूर्ण कराव्यात, उमरकांचन येथील धरणग्रस्तांना कायद्यानुसार चारपट जमीन किंवा कायमस्वरूपी निर्वाह भत्ता द्यावा, ते शक्‍य नसल्यास इतर धरणग्रस्तांप्रमाणे जमिनीऐवजी रोख रक्कम मिळावी, सावंतवाडी (जिंती) येथील प्रकल्पग्रस्तांना रोख रक्कम द्यावी, उमरकांचन गावठाणातील नागरी सुविधांची कामे पूर्ण करून भूखंडापासून वंचित कुटुंबांना भूखंड मिळावेत आदी मागण्या निवेदनात असून या प्रश्नी तातडीने बैठक न बोलविल्यास संघर्ष उभारण्याचा इशारा दिला आहे. 

धरणग्रस्तांच्या नाकातोंडात पाणी शिरण्याची वेळ आलेली असतानाही पुनर्वसनाचे प्रश्न लोंबकळत ठेवून नेमके काय साधले जात आहे? आता तातडीने बैठक न बोलविल्यास संघर्ष अटळ आहे. 
-देवराज देशमुख, राज्य समन्वयक, जनजागर प्रतिष्ठान 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com