
रेल्वेच्या बांधकाम विभागाने तातडीने फलटण-पंढरपूर या रेल्वे मार्गाचे नव्याने सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यामुळे हा मार्ग प्रत्यक्षात उतरण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फलटण-पंढरपूर या बहुचर्चित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून सुमारे 1 हजार 400 कोटी रुपयांच्या या प्रकल्पास केंद्र सरकारने 700 कोटी व राज्य सरकारने 700 कोटी खर्च करायचा आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात उतरण्यासाठी राज्य सरकारकडून 700 कोटी रुपये गुंतवणुकीच्या हमीची प्रतिक्षा सद्यस्थितीत केंद्र सरकारचे रेल्वे मंत्रालय करीत आहे.
‘फलटणची रेल्वे’ हा खरं तर तालुक्यातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून लोणंदहून फलटणला रेल्वे आली खरी, पण फलटणहून पुढे रेल्वे अद्याप कुठेच धावू शकली नाही. त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरु केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे या रेल्वे मार्गासाठी वारंवार पाठपुरावा देखील केला. त्याचेच फलित म्हणून या रेल्वे मार्गासाठी सुमारे 1 हजार 400 कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार करुन त्यास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये केंद्राने 700 व राज्य सरकारने 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी, असे प्रयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, रेल्वेच्या बांधकाम विभागाने तातडीने फलटण-पंढरपूर या रेल्वे मार्गाचे नव्याने सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यामुळे हा मार्ग प्रत्यक्षात उतरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, राज्य सरकारने या मार्गासाठी 700 कोटींच्या गुंतवणुकीची हमी द्यावी, असे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिल्यानंतर अद्याप तरी राज्य सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याचे समजत आहे.