पाटणातील गावं होणार पाणीदार; गृहराज्यमंत्र्यांचे नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचे नियोजन

अरुण गुरव
Saturday, 16 January 2021

पाटण तालुक्‍यात पावसाचे प्रमाण जास्त असले, तरी पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. यावर मात करण्यासाठी पाटण तालुक्‍यात धरणांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली.

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यात धरणे बांधून पाणी अडवण्यात आल्यानंतर आता नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यानुसार गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सन 2020-2021 च्या आर्थिक वर्षात यासाठी आवश्‍यक निधी उपल्बध करण्याकरिता राज्याच्या मृद आणि जलसंधारण विभागाकडे मागणी केली आहे. या कामांना लवकरच निधी मंजूर होऊन परिसरातील जलस्त्रोत्रांचे पुनर्भरण आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे नजीकच्या कालावधीत तालुक्‍यातील गावे पाणीदार बनणार असल्याचे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
 
पाटण तालुक्‍यात पावसाचे प्रमाण जास्त असले, तरी पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. यावर मात करण्यासाठी पाटण तालुक्‍यात धरणांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. त्यानुसार नद्यांवर धरणे बांधून पाणी अडवण्यात आले; परंतु धरण प्रशासन हे शासनाच्या नियोजनानुसार उन्हाळ्यात 15- 15 दिवस नदीला पाणी सोडत नाही, त्यामुळे नदीकाठला असणाऱ्या उपसा जलसिंचन योजना, पिण्याच्या पाण्याचा योजना बंद असतात. पाण्याअभावी कृत्रिम पाणीटंचाईचा सामाना जनतेला करावा लागतो.

कोरोना लसीचा चांगला परिणाम जनमानसांत दिसेल; गृहराज्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

आता तालुक्‍यातील नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडवण्याचे नियोजन करण्यात आल्याने पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. पाटण तालुक्‍यातील ढेबेवाडी विभागातील वांग नदीवर शितपवाडी आणि काळगाव, कुठरे येथील मोरेवाडी, धामणी, बनपुरी, मालदन, उत्तरमांड नदीवर माजगाव येथे, तर मोरणा नदीवर बेलवडे खुर्द, वाडीकोतवडे येथे, तारळी नदीवर नुने आणि बांबवडे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, तर कुंभारगाव येथे साठवण तलाव बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

मेडिकल कॉलेजसाठी 495 कोटींचा निधी मंजूर; आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश  

जलस्त्रोत्रांचे पुनर्भरण, भूगर्भातील पाणीपातळी वाढणार 
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे जलसंधारण व त्याद्वारे पिकांना थेट संरक्षित पाण्याची सोय करणे, त्याचबरोबर परिसरातील जलस्त्रोत्रांचे पुनर्भरण आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. गृह राज्यमंत्री देसाई यांच्या या नियोजनामुळे तालुक्‍यातील गावे पाणीदार बनणार आहेत. 

साताऱ्यात 654 ग्रामपंचायतींसाठी 75 टक्के मतदान; गावकारभाऱ्यांचे राजकीय भवितव्य मशिन बंद

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Minister Shambhuraj Desai Will Provide Water To The Villages In Patan Taluka