
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे.
वाई (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावच्या यात्रा-जत्रा साजऱ्या न करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. असे असताना प्रशासनाचा आदेश डावलून ग्रामस्थांनी बगाड यात्रा भरवल्याने पसरणी गावच्या यात्रा समितीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार रणजित भोसले यांनी दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केला असून, यात्रा व लग्नकार्य यांना मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. वाई तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या यात्रांवर ही बंदी घातली आहे. तशी पत्रे तहसीलदारांनी संबंधित गावांना दिली आहेत. त्यामध्ये पसरणीचा समावेश आहे. येथील काळभैरवनाथ बगाड यात्रेला बुधवारी (ता. 3) मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदार भोसले यांनी ग्रामसेवक व सरपंच यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण माहितीय?; प्रसिध्द अभिनेता आमिर खाननेही केली या गावात पिक्चरची शुटिंग
शेकडो वर्षांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून यात्रा समितीने काही मोजक्याच लोकांना घेऊन बगाड उभारले असून, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने यात्रा कालावधीत धार्मिक विधी हा पुजारी व केवळ पाच लोक यांनी करण्याचे आदेश असतानाही पसरणीतील यात्रा समितीने बगाडासाठी गर्दी जमविल्याचा ठपका ठेऊन तहसीलदारांनी यात्रा समितीवर कलम 188 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
साताऱ्यात टोलमाफीचा भडका उडणार?; उदयनराजेंच्या भूमिकेला शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजेंचा पाठिंबा
नियम पाळून कार्यक्रम
यात्रा समितीने पहाटे कमीत कमी लोकांसोबत शासनाने दिलेले नियम पाळून देवाची विधिवत पूजा व बगाडाचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी पहाटे सहा वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बगाड उभारण्याचा कार्यक्रम केला. या वेळी बघ्यांची गर्दी झाली होती. प्रत्यक्षात बगाड उभारणारी मंडळी थोडीच होती, असे ग्रामस्थ सांगत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे