
1967 च्या विनाशकारी भूकंपाने सुपने जुन्या गावचे सध्याच्या नवीन गावठाणात पुनर्वसन झाले आहे.
तांबवे (जि. सातारा) : सुपने (ता. कऱ्हाड) येथे सुमारे 700 वर्षांचा इतिहास व वारसा असणाऱ्या जुन्या गावठाणमधील तत्कालीन वेशीलगतच्या महादेव मंदिर परिसरात सुमारे दहा समाधी स्थाने आढळून आली. त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
1967 च्या विनाशकारी भूकंपाने सुपने जुन्या गावचे सध्याच्या नवीन गावठाणात पुनर्वसन झाले. त्यामुळे संबंधित समाधीस्थाने दुर्लक्षित झाली होती, तसेच बहुतांश ग्रामस्थ याबाबत अनभिज्ञ असल्याने समाधिस्थान परिसरात झाडेझुडपे वाढल्यामुळे काही समाधी नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या. सुपन्यातील दुर्गप्रेमी शिवाजी पाटील यांच्या निमंत्रणावरून इतिहास संशोधकांनी सुपने गावातील समाधी स्थाने पाहण्यासाठी भेट दिली.
हे पण वाचा- Success Story : कर हर मैदान फ़तेह! हिना इनामदारची भारतीय सैन्य दलात जिगरबाज भरारी
यादरम्यान प्रथम सर्व समाधीस्थानांची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर काही समाधी भोवती उत्खनन केले असता या समाधीवर शिलालेख व राजचिन्हे आढळली. त्यावरून त्या समाधी रणांगणावर पराक्रम गाजवलेल्या, धारातीर्थी पडलेल्या वीर पुरुषांच्या असल्याचे सिद्ध होत असल्याचे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. महादेव मंदिर परिसरात अनेक विरगळी, तसेच सतीशीलाही आहेत. हा ऐतिहासिक ठेवा व वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी आता ग्रामस्थ व तरुण सरसावले आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे