काळजी करु नका! मी तुमच्या पाठीशी आहे; उदयनराजेंचा पालकांसह विद्यार्थ्यांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

काळजी करु नका! मी तुमच्या पाठीशी आहे : उदयनराजे

सातारा : कोरोनाच्या काळात शिक्षणाच्या (education) बाबतीत सर्वांची परीक्षा पाहणारा आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी शिक्षकांना (teachers) सर्वोच्च प्राधान्य देत संस्थेच्या व वेळप्रसंगी स्वत:च्या राखीव निधीतून शिक्षक (teachers) आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन, पगार (salary) करावेत. पालकांशी (parents) समन्वय साधून त्यांची सद्यःस्थिती समजून घेत पाल्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत (educational fee) ५० टक्के सवलत द्यावी, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी केले आहे. कोरोनाच्या काळात शैक्षणिक शुल्काकरिता कोणी गळचेपी केल्यास दखल घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. (satara-news-udayanraje-bhosale-appeals-schools-fifty-percent-discount-admission-to-parents)

शाळांकडून पालक व पाल्यांना शैक्षणिक शुल्काबाबत होणाऱ्या अडवणुकीबाबत पत्रकाद्वारे उदयनराजेंनी सूचना केल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे, की शिक्षण संस्थांनी केवळ शैक्षणिक शुल्क दिले नाही म्हणून पाल्याची आणि पालकांची अडवणूक करू नये. पालकांनीही आपली परिस्थिती असेल तर ज्ञानदान करणाऱ्यांना सहकार्य करावे. कोरोनाकाळात पालक आणि पाल्यांची कोणी शैक्षणिक शुल्कासाठी गळचेपी करीत असेल, तर त्याची आम्ही वेळीच दखल घेऊ.

खासगी शाळांच्या शुल्काबाबत पालकांनी उभारलेल्या सातारा जिल्हा पालक संघाच्या चळवळीस पाठिंबा आहे, असे नमूद करून उदयनराजेंनी म्हटले, की शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांसह त्यांच्या पाल्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून खासगी शाळा या आपले नाव उंचाविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात. त्यामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा वाटा अनन्यसाधारण आहे. तथापि सध्याचा कोरोना कालावधीत शिक्षणाच्या संबंधित सर्वांचीच परीक्षा पाहणारा आहे.

त्यामुळे संस्था चालकांनी शिक्षकांना सर्वोच्च प्राधान्य देत संस्थेच्या व वेळप्रसंगी स्वत:च्या राखीव निधीतून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन, पगार वेळच्या वेळी करावेत. पालकांशी समन्वय साधून त्यांची परिस्थिती समजावून घेऊन, पाल्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घ्यावा.

Udayanraje Bhosale

Udayanraje Bhosale

जिल्ह्यात केवळ शैक्षणिक शुल्कासाठी पालकांना जबरदस्ती, अपमानित करणे किंवा निकाल राखून ठेवणे, पुढील वर्षाचा प्रवेश रखडवणे, असे प्रकार तातडीने बंद करावेत. केवळ शुल्क दिले नाही म्हणून पाल्यांचे शैक्षणिक नुकसान करणे कोणालाच मान्य होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्काकरिता आम्ही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. याबाबत काही तक्रारी असतील तर पालकांनी जलमंदिर पॅलेस येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा. आम्ही योग्य तो तोडगा काढू.

जिल्ह्यात केवळ शैक्षणिक शुल्कासाठी पालकांना जबरदस्ती, अपमानित करणे किंवा निकाल राखून ठेवणे, पुढील वर्षाचा प्रवेश रखडवणे, असे प्रकार तातडीने बंद करावेत

- उदयनराजे भोसले

काही सुखद बातम्या वाचा

टॅग्स :Udayanraje BhosaleSatara