टोलचे भूत मानगुटीवरून उतरणार कधी?; उदयनराजेंसह महाविकास आघाडीतील नेत्यांची भूमिका ठरणार महत्त्वाची!

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : पुण्याप्रमाणे साताऱ्यातील दोन टोलनाक्‍यांवर 'एमएच 11' व 'एमएच 50' क्रमांकांच्या वाहनांना सूट मिळावी, या मागणीसाठी आक्रमक झालेले लोकप्रतिनिधी आता मार्चअखेर झाली, तरी शांतच राहिले आहेत. पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे तेथील टोलनाक्‍यावर आजही सूट मिळत आहे. खासदार उदयनराजेंनीही आक्रमक भूमिका घेतल्यास सातारकरांना ही टोल सूट मिळेल. त्यासाठी उदयनराजेंसह सर्वच लोकप्रतिनिधींनी पक्ष व राजकारण थोडे बाजूला ठेवत एकत्र येऊन जनरेटा उभा करायला हवा आहे, तरच सातारकरांच्या मानगुटीवर बसलेले टोलचे भूत बाजूला होईल. 

साताऱ्यात आनेवाडी व तासवडे असे टोलनाके असून, ते खासगी व्यवस्थापनांकडून चालविले जात आहेत. हे टोलनाके यापूर्वी अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरले आहेत; पण या वर्षी प्रथमच खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांना टोलमध्ये सूट मिळावी, यासाठी भूमिका घेतली आहे. त्याला आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर सातारकरांनाही आता टोल माफी मिळेल, अशी आशा लागली होती. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता या सर्व बाबींकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. याच दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यातील एका कार्यक्रमात अशा पद्धतीने टोलमाफी देता येत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर या महत्त्वाच्या प्रश्‍नाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. 

टोलनाक्‍याच्या 20 किलोमीटर परिघातील गावांतील वाहनांना टोल घेतला जात नाही; पण साताऱ्यात केवळ काही स्थानिक गावांनाच टोल सवलत पास दिला जात आहे, तसेच काही टोलनाक्‍यांवर रिटर्न पासची सुविधा नाही. त्यामुळे सातारकरांना महामार्गावरून दोन्हीकडे केवळ 50 किलोमीटर जायचे झाल्यास टोल भरावा लागतो. अशीच परिस्थिती पुण्यात झाली होती. त्या वेळी खासदार सुळे यांनी पुढाकार घेऊन जनतेचा रेटा उभारला. परिणामी, तेथील "एमएच 12' व "एमएच 14' क्रमांकांच्या वाहनांना टोलमध्ये सूट देण्यात आली आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणाकडे कोणतीही नोंद नसली, तरी लोकप्रतिनिधींनी जनतेच्या माध्यमातून उभारलेल्या लढ्याला यश मिळालेले आहे.

तसाच लढा साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उभारण्यासाठी पाऊल टाकले आहे. त्यांनी याबाबत महामार्ग प्राधिकरण, तसेच जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन पुण्याप्रमाणे साताऱ्यातील "एमएच 11' व "एमएच 50' क्रमांकांच्या वाहनांना दोन्ही टोलनाक्‍यांवर सूट मिळावी, अशी मागणी केली आहे. त्याला सर्वपक्षीय आमदार व खासदारांनी पाठिंबा दिला आहे; पण त्यासाठी आंदोलन कधी उभे राहणार याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन जनरेटा उभारल्यास साताकरांच्या मानगुटीवर बसलेले टोलचे भूत उतरणार आहे. 

नेमकी परिस्थिती काय... 

खेड शिवापूर टोलनाक्‍यावर पुणे जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी नाही. मात्र, टोलनाक्‍याच्या 20 किलोमीटर परिघातील गावांतील नागरिकांना मासिक पास 275 रुपये भरून दिला जातो, तर काही ओळखीच्या व्यक्तींना मोफत सोडले जाते. त्यामुळे साताऱ्यातील वाहनांना टोलमध्ये सूट मिळण्यात अडचणी आहेत. त्यामुळे आता साताऱ्यातील दोन खासदार याबाबत कोणती भूमिका घेणार यावर टोलमाफीचे गणित अवलंबून आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com