
गुरुवारी (ता.14) संक्रांतीदिवशी सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत शहरातील श्रीराम मंदिर व परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
फलटण शहर (जि. सातारा) : शहराचे ग्रामदैवत व ऐतिहासिक राम मंदिरात कोरोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने महिलांना संक्रांतीदिवशी वाणवसा घेण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे कोरोनामुळे हजारो महिलांच्या "वाणवस्यावर संक्रांत' आली आहे. ग्रामीण भागातील मंदिरातही महिलांना गर्दी करता येणार नाही. परिणामी, महिलांना यंदा घरीच वसा घ्यावा लागणार आहे. (Makar Sankranti Festival)
राम मंदिरामध्ये शहरासह तालुक्यातील गावागावांमधून, तसेच शेजारील जिल्ह्यातील तालुक्यांतूनही संक्रांतीदिवशी महिला मोठ्या संख्येने येऊन वाणवसा घेतात. सकाळी सहापासून सायंकाळी उशिरापर्यंत राम मंदिर व आजूबाजूचा परिसर हजारो महिलांच्या गर्दीने गजबजतो. ग्रामीण भागातील महिला गाड्या करून येतात व येताना डबाही घेऊन येत असतात. राम मंदिराबरोबरच जबरेश्वर मंदिर, माळजाईदेवी, तळ्यातील देवी यांसह अन्य मंदिरांतही महिला जातात. परंतु, यंदाच्या संक्रांतीला मात्र दरवर्षी दिसणारे गर्दीचे चित्र दिसणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दी करण्यास प्रतिबंध केला आहे.
कऱ्हाडात गुंडांच्या टोळ्यांवर धडाकेबाज कारवाई; टोळ्यामुक्तसाठी पोलिसांचे अनोखे पाऊल
गुरुवारी (ता.14) संक्रांतीदिवशी सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत शहरातील श्रीराम मंदिर व परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. संक्रांतीदिवशी वाणवसा घेण्यासाठी महिला राम मंदिरात उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता मंदिर व्यवस्थापनाने घ्यायची आहे. शहरातील अन्य मंदिरे व ग्रामीण भागातील मंदिर परिसरात जमावाने गर्दी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये, यासाठी आवश्यक सूचना व आदेशाचे पालन करणे सर्वांवर बंधनकारक राहणार आहे, असे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.
कृषीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, मोदी सरकारला पळवाट : माजी मुख्यमंत्र्यांची टीका
संपादन : बाळकृष्ण मधाळे