शासकीय कार्यालयांतील खासगीकरण रद्द करा; चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे 27 रोजी आंदोलन

प्रशांत घाडगे
Wednesday, 13 January 2021

अनुकंपा तत्त्वावरील भरती विनाअट करावी यासह इतर मागण्यांसाठी 27 ते 29 जानेवारी हे तीन दिवस राज्यभरात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली.

सातारा : शासकीय कार्यालये व रुग्णालयांमधील खासगीकरण रद्द करा, चतुर्थश्रेणीतील 25 टक्के पदे कपात करण्याचा निर्णय रद्द करा, अनुकंपा तत्त्वावरील भरती विनाअट करावी यासह इतर मागण्यांसाठी 27 ते 29 जानेवारी हे तीन दिवस राज्यभरात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी जिल्हा सरचिटणीस प्रकाश घाडगे, कार्याध्यक्ष विष्णू नलवडे, चंद्रकांत जाधव, महिला संघटक कमल पवार, एम. एस. पांचाळ, सुरेश जाधव, राजेंद्र गंगावणे, सुरेश सकटे आदी उपस्थित होते. श्री. पठाण म्हणाले, "शासकीय कार्यालयातील चतुर्थश्रेणीतील रिक्त पदे सरळसेवेने तत्काळ भरावीत, 2005 नंतर शासनसेवेत रुजू झालेल्या नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

हजारमाचीत 18 महिला रिंगणात; लक्षवेधी लढतींकडे जिल्हावासियांच्या नजरा

तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास शासनसेवेत सामावून घ्यावे, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सर्व मनोरुग्णालयातील परिचर व चतुर्थश्रेणीतील रिक्त पदे तत्काळ भरावीत, गृह खात्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना अपघात व मोठ्या आजारपणासाठी शासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांप्रमाणे इतर सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात यावी आदी मागण्या लवकरात-लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा 30 जानेवारीनंतर बेमुदत संप केला जाणार असल्याचा इशारा महासंघाने दिला आहे. 

कऱ्हाडात गुंडांच्या टोळ्यांवर धडाकेबाज कारवाई; टोळ्यामुक्तसाठी पोलिसांचे अनोखे पाऊल

आंदोलनाची दिशा 

27 जानेवारीला राज्यभरात चतुर्थश्रेणी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. 28 जानेवारीला दुपारी 1 ते 2 या वेळेत निदर्शने करण्यात येणार आहेत. 29 जानेवारीला संप पुकारण्यात येणार असल्याची माहिती महासंघाने दिली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Workers Agitation On January 27 In Satara