esakal | कोयनेतील यात्रांत कोरोनाच्या संसर्गाचे विघ्न; सुमारे 15 गावांतील यात्रा रद्द

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

कोयना विभागातील अनेक गावांच्या ग्रामदैवतांच्या यात्रा कोरोनामुळे रद्द झाल्या आहेत.

कोयनेतील यात्रांत कोरोनाच्या संसर्गाचे विघ्न; सुमारे 15 गावांतील यात्रा रद्द
sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना विभागातील अनेक गावांच्या ग्रामदैवतांच्या यात्रा आजपासून सुरू होत असल्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण असतानाच त्यात कोरोनाच्या संसर्गाचे विघ्न आल्यामुळे विरजण पडले आहे. कोरोनामुळे सुमारे 15 गावांतील यात्रा रद्द झाल्या आहेत. 

फेब्रुवारी ते मार्च दरम्यान कोयना विभागातील अनेक गावांच्या ग्रामदैवतांच्या यात्रा असतात. फेब्रुवारीत विभागातील किसरुळे, हुंबरळी, रासाटी, मिरगाव, गोकुळ, बोपोली, वाजेगाव, गोषटवाडी, वांझोळे, कराटे, मणेरी, तळीये, गाडखोप, नवजा, कुशवडे या प्रमुख गावांतील ग्रामदैवतांच्या यात्रा होत आहेत. दरवर्षी यात्रा मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. यात्रेसाठी मुंबईस्थित असणारा चाकरमानी गावाला येत असल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. यात्रा समितीच्या वतीने विविध प्रकारच्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. गतवर्षी यात्रा झाल्यानंतर कोरोनाची साथ आलेली होती. मात्र, सध्या यात्रेच्या तोंडावर कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात्रा, कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. परिणामी भाविकांत नाराजीचे वातावरण आहे. गेल्यावर्षीच्या कोरोनामुळे गावी येऊन परत गेलेला चाकरमानी यात्रा रद्द झाल्यामुळे गावाला आला नसल्याने सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. 

आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीचा टक्का वाढवा; आमदार पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कोयना धरणांतर्गत असणारे झाडोली-शिरशिगेतून केदारनाथ देवाची पालखी आल्यावर किसरुळेची ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा सुरू होते. तर किसरुळेचे ग्रामदैवत भैरवनाथ झाडोली-शिरशिंगेत जावून तेथील ग्रामदैवत केदारनाथ यांची भेट घेतल्यावर या दोन्ही ठिकाणच्या यात्रा होतात. झाडोली-शिरशिंगेचे दहा वर्षांपूर्वी पलूस (जि. सांगली) येथे पुनर्वसन झाले आहे. तेव्हापासून न चुकता ही पालखी या ठिकाणी येते. त्यानंतरच ही यात्रा सुरू होते. यावर्षी यात्राच रद्द झाल्यामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा खंडित होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, ज्या गावांच्या यात्रा आहेत, त्या ठिकाणी प्रमुख व मानकरी व यात्रा समितीच्या प्रमुखांच्या वतीने धार्मिक विधी करण्याला प्रशासनाने परवानगी दिली असल्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे व पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी स्पष्ट केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे