शाळांचा परिसर तंबाखूमुक्त होणार; साताऱ्यात येलो लाइन कॅम्पेनिंगला सुरवात

उमेश बांबरे
Monday, 21 December 2020

शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 200 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. या वर्षी नव्याने आखलेल्या उपक्रमांत पिवळ्या रंगात तंबाखू मुक्त शाळा, असे लिहिण्यात येणार आहे, तसेच तंबाखूमुक्त परिसर असा मराठी फलक लावण्यात येत आहे.

सातारा : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात येलो लाइन कॅम्पेनिंग शालेय स्तरावर करण्यात येत असून, 75 शाळांत हे कॅम्पेनिंग राबविले जात आहे. विद्यालयीन व महाविद्यालयीन मुले व तरुण पिढी तंबाखूपासून परावृत्त व्हावीत, यासाठी शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्री करणारी दुकाने उठवण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्या साहाय्याने हटविण्यात यावीत, यासाठी या कॅम्पेनिंगचे उद्दिष्ट आहे. 

जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच सचिव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व नोडल ऑफिसर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 200 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. 

कऱ्हाड व्हाया काश्मीर; जवान अजित पाटील, सुमनदेवीची प्यारवाली लव्ह स्टोरी

या वर्षी नव्याने आखलेल्या उपक्रमांत पिवळ्या रंगात तंबाखू मुक्त शाळा, असे लिहिण्यात येणार आहे, तसेच तंबाखूमुक्त परिसर असा मराठी फलक लावण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने लवकरात लवकर जिल्ह्यातील 75 शाळांत तंबाखूमुक्त परिसर करण्यात येणार आहेत. यामध्ये दीपाली इंगवले (समुपदेशक- एनटीसीपी), इला ओतारी (सोशल वर्कर- एनटीसीपी) व सूरज कवारे (दंत सहायक - एनओएचपी) यांचे मोलाचे सहकार्य आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Yellow Line Campaign Begin In Satara