

गोंदवले (जि.सातारा) : मुंबईहून सासुरवाडीत आलेल्या जावयाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गोंदवले खुर्दच्या काळजाचा ठोका चुकला. खबरदारी म्हणून संपर्कातील 14 जणांना विलगीकरणात पाठविण्यात असून, प्रशासनाकडून गाव लॉकडाउन करण्यात आले आहे.
किरकसाल (ता. माण) गावचे रहिवासी असलेले; परंतु कामानिमित्त मुंबईस्थित असलेले जावई गेल्या शनिवारी (ता. 13) रात्री उशिरा गोंदवले खुर्दमधील जाधववस्तीतील सासुरवाडीत आले होते. सकाळी त्यांना त्रास जाणवू लागल्याने सासरवाडीच्या कुटुंबीयांनी तत्काळ खासगी दवाखान्यात व तेथूनच लगेच सातारा येथील शासकीय रुग्णालयात नेल्यात आले होते. कोविड 19 ची लक्षणे दिसत असल्याने तत्काळ स्वॅब घेण्यात आला होता. काल रात्री हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला अन् गोंदवलेकरांची झोपच उडाली.
आज सकाळी प्रशासनाने धाव घेत बाधित रुग्णाच्या सान्निध्यात आलेल्या गोंदवले खुर्दमधील 14 जणांना विलगीकरणात पाठवण्यात आले. दरम्यान, बाधित रुग्ण सापडलेली जाधववस्ती गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या वस्तीलगतच्या मुलाणीवस्ती, मोरेवस्ती, कारंडेवस्ती, रामोशीवस्ती, शिंदेवस्ती हा परिसर कंटेंनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मुख्य गावदेखील आजपासून सात दिवस लॉकडाउन करण्यात आले आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, मंडलाधिकारी भरत कर्णे, तलाठी भारती गायकवाड, ग्रामसेवक शरद जाधव, सरपंच अजय पोळ, पोलिस पाटील सचिन अवघडे यांनी परिसराची पाहणी केली. दरम्यान, काल रात्री कोरोनाबाधित म्हणून सापडलेली व्यक्ती किरकसाल गावाची मूळ रहिवासी असली, तरी कामानिमित्त मुंबईस्थित आहे. ते गावातील लोकांच्या सान्निध्यात आले नाहीत त्यामुळे आम्ही अजूनही सुखरूप आहोत, असे किरकसालचे माजी सरपंच अमोल काटकर यांनी सांगितले.
गावात आलेला पाहुणा कोरोनाबाधित सापडल्याने आम्ही अधिक खबरदारी घेत आहोत. लोकांनी सहकार्य करावे.
- अजय पोळ, सरपंच, गोंदवले खुर्द
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.