शेतकऱ्यांसाठी आता ऑनलाइन तारण कर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

लॉकडाउनमुळे जिल्हाबाहेर प्रवास करता येत नसल्याने शेतीमाल बाजारपेठेत नेताना अनेक अडचणी येत आहेत. स्थानिक बाजारपेठेत शेतीमालाला भावही चांगला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता येईल. गोदामात साठवून ठेवलेल्या शेतीमालावर ऑनलाइन पद्धतीने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. 
 

कऱ्हाड (जि. सातारा) ः लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्याला शेतमाल बाजारपेठेत नेताना अडचणी आल्यास अथवा शेतमालास योग्य किंमत मिळत नसल्यास शेतकऱ्यांना नजीकच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मालाची साठवणूक करता येणार आहे. गोदाम पावतीवर ऑनलाइन पद्धतीने तारण कर्ज उपलब्ध होण्यासाठी राज्य वखार महामंडळ व राज्य सहकारी बॅंकेच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन तारण कर्ज योजना सुरू केली आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

दरम्यान, ही योजना तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार असून त्यासाठीचा प्रतिसाद पाहून अन्य बॅंकांच्या माध्यमातूनही सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री पाटील म्हणाले, ""राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध ठिकाणी गोदामे आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्य, शेतमाल, औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते. गोदामातील साठवणुकीवर वखार पावती देते. संबंधित वखार पावती वखार अधिनियम 1960 नुसार असून त्यावर बॅंकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते. वखार पावतीवर शेतकऱ्यास प्रत्यक्ष बॅंकेत जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत शेतकरी वखार महामंडळाच्या संगणकीय प्रणालीच्या आधारे ऑनलाइन पध्दतीने बॅंकेस तारण कर्जासाठी आवश्‍यक ती कागदपत्रे सादर करू शकतात. तसेच मोबाईल ऍपच्या आधारे मराठीतही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. स्मार्ट फोनद्वारे शेतकऱ्यांना आवश्‍यक कागदपत्रे स्कॅन करून पाठवता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा बॅंकेत जाण्याचा वेळ व पैसेही वाचतील.'' 

पालकमंत्री म्हणाले, ""तारण कर्जाचा नऊ टक्के व्याजदर असून अन्य बॅंकेच्या तुलनेत हा सर्वांत कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा प्रति शेतकरी पाच लाख असून वखार महामंडळाकडून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच योजनेंतर्गत तारण कर्ज देणे, त्याची परतफेड, सध्याचा बाजारभाव, उपलब्ध अन्नधान्यसाठा या बाबी ऑनलाइन होणार असल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.'' 

ऑनलाइन तत्काळ कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकरी बांधवांच्या वेळेची बचत तसेच कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होईल. 

-बाळासाहेब पाटील, पालकमंत्री, सातारा 

 

 

कॉटेजला बाबा देणार एक कोटी, कोविड मान्यता काढल्याने नामुष्की


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Online mortgage loans for farmers now