अवयवदानातून मिळाले चार रुग्णांना जीवनदान

उमेश बांबरे
Saturday, 29 August 2020

मेंदू मृत रुग्णांचे अवयव गरजू रुग्णांपर्यंत पोचवण्याचे आव्हान अवयव प्रत्यारोपण समितीने यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळेच चेन्नई, हैदराबाद तसेच पुणे शहरातील गरजू रुग्णांना नवीन जीवनदान मिळण्यास मदत झाली. 
 

सातारा ः कोरोना साथीच्या काळात एका ठिकाणी जीव चालले आहेत तर दुसऱ्या ठिकाणी मेंदू मृत रुग्णांचे अवयव गरजू रुग्णांपर्यंत पोचवण्याचे आव्हान अवयव प्रत्यारोपण समितीने यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळेच चेन्नई, हैदराबाद तसेच पुणे शहरातील गरजवंत रुग्णांना नवीन जीवनदान मिळण्यास मदत झाली. 

घरामध्ये 39 वर्षीय महिला पाय घसरून पडल्याने मेंदूला दुखापत झाली, तसेच रक्तस्त्राव सुरू झाला. त्या महिलेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला मेंदू मृत घोषित करण्यात आले. नातेवाईकांना अवयवदान करता येऊ शकते व त्याचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकाने अवयवदानाचा निर्णय घेतला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मदत व अवयव प्रत्यारोपण समिती प्रमुख आरती गोखले यांच्यामुळे यकृत "दीनानाथ'मधील रुग्णाला वापरण्यात आले. तसेच मूत्रपिंड पुण्यातच ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवण्यात आल्याचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे अवयवदान समनव्यक प्रतीक देशमुख यांनी सांगितले. "दीनानाथ'तर्फे डॉ. वृषाली पाटील, डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. सचिन पळणिटकर, डॉ. निनाद देशमुख यांचे सहकार्य लाभले. 
कोरोना काळात निर्बंध पाहता प्रवास करणे खडतर आहे. अशा काळात हृदय चेन्नईला रामा हॉस्पिटल, तर फुफ्फुसे किमस्‌ हॉस्पिटल हैदराबादला ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने पाठवण्यात आले. यामध्ये समन्वयक सरफराज शेख, स्थानिक पोलिस तसेच वाहतूक पोलिस यांच्या मदतीने हे आव्हान यशस्वीपणे पार करून वेळेत अवयव पोचवण्यात आले व रुग्णांना एक नवीन आयुष्य मिळाले. 

आपणही कोणाला तरी नवीन जीवन देऊ शकतो 
आज या काळामध्ये आपण कोणाला नवीन जीवन देऊ शकतो व आपल्या मरणानंतर कोणाच्यात जिवंत राहू शकतो, ते म्हणजे अवयवदानामुळे. आज महाराष्ट्रात काही सामाजिक संस्था अवयवदान चळवळ राबवत आहेत आणि लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. कोमल न्यू लाइफ फाउंडेशन सातारा, री बर्थ पुणे, फेडरेशन ऑर्गन अँड बॉडी डोनेशन नाशिक अशा संस्थांचा यात समावेश आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल व अवयव प्रत्यारोपण समितीच्या (पुणे) पुढाकारामुळे हे शक्‍य झाले. 

(संपादन ः पांडूरंग बर्गे) 
 

आमच्यात भेदभाव कशासाठी?, सैनिकांचा सरकारला सवाल 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Organ donation saved the lives of four patients