Satara : पन्हाळगड ते पावनखिंड पायी मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

Satara : पन्हाळगड ते पावनखिंड पायी मोहीम

नागठाणे : धुके, धो धो पाऊस अन् भन्नाट वारा, हिरवीकंच राने, हिरव्यागर टेकड्या अन् बहरलेली फुले, खळाळणारे झरे अन् आडरानातील चिखलवाटा... या सोबतीला देदीप्यमान इतिहासाचे स्मरण करत वाईतील शिक्षकांनी पन्हाळगड ते पावनखिंड ही सुमारे ५० किलोमीटर अंतराची पायी मोहीम दोन दिवसांत यशस्वी केली.

पावनखिंडीचा रणसंग्राम म्हणजे इतिहासातील सोनेरी पान. याच इतिहासाच्या स्मृती जागवित वाई तालुक्यातील तीस प्राथमिक शिक्षकांनी रविवारच्या सुटीत पन्हाळगड ते पावनखिंड ही पायी मोहीम पूर्ण केली. वीर शिवा काशीद अन् बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास वंदन करून, शिवगर्जनेचा जागर करत किल्ले पन्हाळगडावरून या मोहिमेचा प्रारंभ झाला. तुरुकवाडी, म्हाळुंगे, मसाई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी, म्हंडलाईवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, पाटेवाडी, मसावडे जंगल, पांढरेपाणी आदी गावे, वाडी-वस्त्या ओलांडत ही मोहीम सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावरील पावनखिंडीत पोचली. तिथे वीर बाजीप्रभू देशपांडे अन् बांदल सेनेच्या पराक्रमस्थळी अभिवादन केले.

वाईचे गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्या संकल्पनेतून मोहीम आखली. उपक्रमशील शिक्षक उद्धव निकम यांनी त्याचे नियोजन केले. मोहिमेत ओजस महामुनी हा सात वर्षांचा चिमुरडाही सहभागी झाला होता. रामदास राऊत हे साठ वर्षांचे इतिहासप्रेमीही मोहिमेत सहभागी होते. मोहिमेच्या यशश्‍वितेसाठी नारायण शिंदे, प्रदीप फरांदे, सुरेश यादव, शांताराम मासाळ, शैलेश मोरे, राजेंद्र दगडे, हणमंत फरांदे, राजेंद्र जाधव, सहदेव फणसे, सचिन पवार, गजेंद्र ननावरे, नंदकुमार पवार, महादेव क्षीरसागर, धर्मेंद्र दीक्षित, रमेश मांढरे, तानाजी कुंभार, नीलेश शिंदे, संजय लोखंडे, लक्ष्मण माने, मिलिंद गाढवे, नरेंद्र सणस आदींनी परिश्रम घेतले.

इतिहास विषयाचे प्रभावी अध्यापन करण्यासाठी अशा मोहिमा उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. प्रत्यक्ष अनुभूतीबरोबरच भौगोलिक संकल्पना, संस्कृती, परंपरा, लोकजीवन या दृष्टीनेही मोहिमेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

-सुधीर महामुनी, गटशिक्षणाधिकारी, वाई

Web Title: Satara Panhalgarh To Pawankhind Foot Expedition 30 Teacher Successful Journey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..