सातारा : आंदोलनापूर्वीच आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात; रयत क्रांतीची घोषणाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सातारा : आंदोलनापूर्वीच आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात; रयत क्रांतीची घोषणाबाजी

कऱ्हाड : शेतकऱ्यांना यंदा गाळपास जाणाऱ्या उसाची पहिली उचल एकरकमी एफआरपी एवढी मिळावी, या मागणीसाठी आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने सह्याद्री साखर कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, तत्पूर्वीच आज सकाळी रयत क्रांतीचे नेते सचिन नलवडे व कार्यकर्त्यांना त्यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, संघटनेच्या नेत्यांनी सह्याद्री साखर कारखान्याने पहिला हप्ता एकरकमी एफआरपी एवढा न दिल्यास आंदोलन करू, असा इशारा या वेळी दिला.

आंदोलनापूर्वीच आज संघटनेचे श्री. नलवडे व सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बनवडी येथील सह्याद्री कारखाना गट कार्यालयासमोर नेले. तेथे शेतकऱ्यांनी उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. या वेळी रयत संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, राजमाचीचे सरपंच शिवाजी डुबल, बाबूराव जगदाळे, सुभाष नलवडे उपस्थित होते. गट ऑफिससमोर उपस्थित असलेले कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, शेती अधिकारी मोहन पाटील, व्ही. बी. चव्हाण, श्री. पिसाळ यांच्या सोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्या वेळी सहकारमंत्र्यांनी सह्याद्रीचा दर संचालक बैठकीत ठरवणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: दिल्लीच्या सीमांवरील बॅरिकेड्स हटवले; पोलिसांनी सांगितले कारण...

त्यामुळे आपण सह्याद्रीच्या ऊस दर बैठकीत शेतकऱ्यांची एकरकमी एफआरपीची बाजू लावून धरून ठराव करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे निवेदन उपस्थित संचालकांना या वेळी देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर श्री. नलवडे, शिवाजी पाटील यांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेऊन तालुका पोलिस ठाण्यात नेले. त्याचदरम्यान श्री. नलवडे म्हणाले, ‘‘सहकारमंत्री सत्तेचा, मंत्री पदाचा गैरवापर करत आहेत. पोलिसांवर दबाव टाकून जनतेसाठी असणाऱ्या पदाचा वापर स्वतःसाठी करत आहेत.

हेही वाचा: मुंबईतील सुरक्षारक्षक आहेत की गुंड ?; पाहा व्हिडीओ

सह्याद्री कारखान्याच्या साखर निर्यातीत जास्त दर मिळाला आहे. कारखाना कर्जमुक्त आहे. रिकव्हरी चांगली आहे, असे मंत्री सांगत आहेत. मग कोल्हापूर, सांगलीसारखी एकरकमी एफआरपी देण्यास अडचण काय आहे? सह्याद्री साखर कारखान्याने पहिला हप्ता एकरकमी एफआरपी एवढा दिला नाही, तर रयत संघटनेचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते येणाऱ्या काळात सह्याद्री कारखान्यावर आंदोलन करतील.’’

loading image
go to top