सातारा : पोलिसांनो, आता साहेबांना थेट भेटा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police

सातारा : पोलिसांनो, आता साहेबांना थेट भेटा!

सातारा : अडचणीच्या वेळी पोलिस अधीक्षकांची भेट मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियम व शिष्टाचाराच्या बंधनातून मार्ग काढावा लागत होता. पूर्व परवानगीशिवाय अधीक्षकांशी थेट भेट कर्मचाऱ्यांसाठी दुरापास्तच होती; परंतु हे बंधन बाजूला ठेवत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटीचा थेट मार्ग खुला केला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करत खऱ्या अर्थाने पोलिसांना अनेक वर्षांपासून आवश्यक असलेल्या वेल्फेअरचा राजमार्ग सुरू केला आहे.

पोलिसदादाच्या स्वत:च्या समस्यांच्या निराकरणासाठी पोलिस अधीक्षक हा एक महत्त्वाचा घटक असतो. त्याच्या कार्यालयीन, तसेच कौटुंबिक समस्यातही अनेकदा अधीक्षकांकडून योग्य मार्ग निघतो; परंतु आपले गाऱ्हाणे अधीक्षकांपर्यंत पोचवायचे म्हणजे नियम व शिष्टाचारातून त्याला जावे लागत होते. पोलिस दल हे शिस्तीचे खाते. ब्रिटिश कालापासून देशात ते सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर ते देशाचे झाले; परंतु ब्रिटिश काळातील अनेक पद्धती आजही पोलिस दलात रूढ आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे अधीक्षकांशी थेट भेट घेण्याबाबतचा होता.

अधीक्षक हे जिल्हा पोलिस दलातील सर्व कर्मचाऱ्यांचे पालक असतात. त्यांच्या अडचणी जाणून त्या सोडवून त्याचे मनोबल वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते; परंतु कर्मचाऱ्याला आपल्या पालकाकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठीही कागदोपत्री सोपस्कार करावे लागत होते. त्यासाठी पोलिस ठाण्याच्या प्रमुखामार्फत किंवा प्रत्यक्ष पोलिस मुख्यालयाशी पत्रव्यवहार करण्याची पद्धत आहे. त्यातही अधीक्षकांकडे कामाची लगबग असली, की ही भेट अनेक दिवस रखडते. त्यामुळे सहाजिकच मदतची गरज असलेल्या कर्मचारी मानसिक तणावाखाली येतो. कर्मचाऱ्यांची ही परवड लक्षात घेत पोलिस अधीक्षक बन्सल यांनी शिष्टाचार बाजूला ठेवत कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना विशेष अडचण असल्यास सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी १२ ते दोन या कालावधीत ते केव्हाही समक्ष भेटू शकतील. त्यासाठी त्यांना स्वतंत्र आज्ञांकित कक्ष मिळण्यासाठी पत्रव्यवहार करण्याची गरज असणार नाही. त्यामुळे पोलिस कर्मचारी व अधीक्षकांच्या थेट भेटीला आता कोणताही अडसर राहणार नाही. अधीक्षकांच्या या निर्णयाने सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

पोलिसांसाठी हेल्पलाइनही

नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांची हेल्पलाइन २४ तास कार्यरत असते. त्यातून अनेकांना मदतही मिळते. नागरिकांचे प्रश्न सोडविणाऱ्या पोलिसांसाठीही अधीक्षकांनी आता हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यासाठी ०२१६२-२३४१३० हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी आता आपल्या प्रशासकीय अडचणीचे निरसन करण्यासाठी या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतील. त्यातून त्यांच्या अडचणी तत्काळ सोडविल्या जाऊ शकणार आहेत.

loading image
go to top