

Search Drives Intensify Across Satara Over Suspected Bangladeshi Presence
sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: पोलिस दरबारी संवेदनशील असलेल्या कऱ्हाड या शहराजवळील मुंढे गावात बांगलादेशी नागरिक सहा महिन्यांपासून राहात होते. त्याचा पर्दाफाश कऱ्हाड शहर पोलिसांनी केला. बांगलादेशींच्या कऱ्हाडमधील घुसखोरीनंतर आता जिल्हा पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे. घुसखोरांपासून होणारा संभाव्य धोका विचारात घेऊन पोलिसांकडून आता परदेशी नागरिकांसह परप्रांतीयांचीही कसून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी आता एक पाऊल पुढे टाकले असून, संशयित भागात अचानक छापा टाकून तेथे तपासणी करण्यात येईल. विनापरवाना, बनावट कागदपत्रांच्या आधारे राहणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून जिल्ह्यात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.