मध्यरात्रीची कृष्णकृत्ये एलसीबीने केली उघड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचार बंदी लागू असल्यामुळे पोलिस दल त्याच्या अम्मलबजावणीत गुंतले होते. त्यामुळे जिल्ह्यातील वाळू माफीयांनी डोकेवर काढले होते. रात्रीच्या वेळी नदीपात्रामध्ये त्यांचा धिंगाणा सुरू असायचा. त्यावर वचक बसविण्यासाठी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे.

सातारा ता. 30 : धोम (ता. वाई) येथे काल मध्यरात्री छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) दोन वाळूमाफियांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून डंपर व चार ब्रास वाळू असा तब्बल 25 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. 

हृदय लोकनाथ कश्‍यप (वय 24, रा. सह्याद्रीनगर), दिगंबर नारायण पवार (वय 21, रा. बावधन, ता. वाई) अशी त्यांची नावे आहेत. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यामध्ये जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा व्यस्त आहे. त्याचा गैरफायदा घेत वाळू माफियांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नदीपात्रांतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू केला. नदीपात्रात जेसीबी घालून नदी उकरण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्यावर निर्बंध आणण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने स्वतंत्र पथकाची स्थापना करून जिल्ह्यामध्ये धडक मोहीम उघडली आहे. 

काल रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांना अशीच एका वाळू चोरीची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, फौजदार विलास नागे, आनंदराव भोईटे, मोहन नाचन, संतोष जाधव, गणेश कापरे, वैभव सावंत, गणेश कचरे, विजय सावंत यांच्या पथकाला तातडीने धोम (ता. वाई) येथे जाण्यास सांगितले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हे पथक नदीपात्रात पोचले. 

त्या वेळी कृष्णा नदीच्या पात्रात जेसीबीच्या साहाय्याने वाळूचे उत्खनन सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 
चौकशी केल्यानंतर हा प्रकार बेकायदेशीर वाळू चोरीचा असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने दोन संशयितांना ताब्यात घेतले, तसेच त्यांच्याकडील जेसीबी, डंपर व चार ब्रास वाळू असा सुमारे 25 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. दोघांवर वाई पोलिस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बापरे..! सातारा जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर वाढला 

अर्ज कोल्हापूर, सांगलीचा अन् मुक्काम साताऱ्यात; कसा येणार कोरोना आटोक्यात

कोरोनाशी लढण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नवीन शस्त्र; रुग्णांचे प्राण वाचविण्यात होणार मदत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Police raided on Sand Mafia