सातारा : पोलिसांना प्रतीक्षा पदोन्नतींची

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्यांना मिळणार का ‘स्टार’
Police
Police sakal

सातारा : आश्वासित प्रगती योजनेंतर्गत पोलिस दलातील जवानांना देणे आवश्यक असलेल्या पदोन्नतीच्या प्रक्रिया अन्य काही जिल्ह्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यात पार पडली नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस दलातील पात्र असलेले जवान पदोन्नतीपासून वंचित आहेत. त्यामुळे प्रामुख्याने निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांना खांद्यावर सन्मानाने स्टार मिरविण्याचे भाग्य लाभणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

सर्वच शासकीय सेवेमध्ये ठराविक कालावधीची सेवा झाल्यानंतर पदोन्नती देण्यात येते. त्याचप्रमाणे पोलिस दलातही सेवेच्या ठराविक कालावधीनंतर या जवांनाना शिपाईपदापासून नाईक, हवालदार, सहायक फौजदार तसेच काहींना उपनिरीक्षकपदापर्यंतची पदोन्नती मिळते. अन्य शासकीय सेवेत ठराविक गणवेश नसतो. परंतु, पोलिसांना एक ठराविक गणवेश व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदाप्रमाणे खांद्यावर लावण्यासाठी फीत किंवा स्टार असतात. त्यावरून संबंधिताचे पद पटकन लक्षात येते. त्यानुसार शिपाईपद असणाऱ्याच्या खांद्यावर फीत किंवा स्टार नसतो. हवालदाराच्या खांद्यावर तीन फीत, सहायक फौजदाराच्या खांद्यावर एक स्टार तर उपनिरीक्षकाच्या (फौजदार) खांद्यावर दोन स्टार असतात. शिपाई म्हणून भरती झालेल्या जवानाचे खांद्यावर एक किंवा दोन स्टार लावण्याचे स्वप्न असते. पदोन्नतीनंतर मिळणाऱ्या पगारवाढीपेक्षा खांद्यावर लावायला मिळणारा स्टार त्याच्यासाठी महत्त्‍वाचा असतो.

पोलिस दलात त्यासाठी आश्वासित प्रगती योजना आहे. त्यानुसार दहा वर्षे सेवा झालेल्या पोलिस शिपाई, पोलिस नाईकपदावरील व्यक्तीला पोलिस हवालदारपदाचे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे ठरले आहे. २० वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर प्रथम पोलिस हवालदार नंतर सहायक पोलिस उपनिरीक्षकपदाचा लाभ मिळतो. त्यानंतर तीस वर्षे सेवा झालेल्या व सहायक पोलिस उपनिरीक्षकपदावर किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या किंवा ज्यांना उपनिरीक्षकाला वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त पगार आहे, असे तीनही निकष पूर्ण करणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रेणीतील अंमलदारांना श्रेणी उपनिरीक्षकपदाची आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देय आहे.

पोलिस हवालदार, सहायक निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक तसेच श्रेणी पोलिस उपनिरीक्षकपदाच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना योग्य वेळी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या सेवा कालावधीत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेल्या अहोरात्र कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते. अनेकांना तर निवृत्तीच्या शेवटच्या टप्‍प्यात का होईना स्टार लावायला मिळण्याची आस असते. परंतु, गेली अनेक वर्षे पोलिस दलात पात्रता पूर्ण करत असतानाही अनेकांना त्यांच्या हक्काचे पदोन्नतीचे पद वेळेत मिळत नव्हते. त्यामुळे स्वप्नांबरोबरच सेवानिवृत्तीच्या लाभामध्येही फरक पडत होता. आयुक्त संजय पांडे यांनी याबाबत गांभीर्याने पुढाकार घेत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने देण्याबाबत पुढाकार घेतला. त्याबाबत शासन निर्णयही झाला.

या निर्णयानुसार राज्यातील काही जिल्ह्यांत त्याची अंमलबजावणीही झाली. त्यामुळे सेवाकाळात मिळणाऱ्या पदोन्नतीचा निवृत्तीपूर्वी लाभ मिळण्याचे भाग्य तेथील पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाले. परंतु, जिल्ह्यात अद्याप याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली नाही.

‘एसपीं’नी पुढाकार घ्यावा

शासकीय पात्रता पूर्ण केलेल्या विशेषत: खांद्यावर स्टार लावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हवालदार, सहायक फौजदारांचा पदोन्नती न झाल्याने हिरमोड झाला आहे. त्यातील काही जण निवृत्तीच्या अगदी उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्यात अधिक अस्वस्थता आहे. एवढी वर्षे जनतेची पर्यायाने पोलिस दलाची सेवा करणाऱ्यांचे त्यांच्या हक्काचे स्वप्न तातडीने पूर्णत्वास येणे आवश्यक आहे. पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी त्याबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com