कऱ्हाडात जनशक्ती-भाजपच्या नगरसेवकांत जोरदार खडाजंगी; सभेत सूचना मांडण्यावरून 'गोंधळ'

सचिन शिंदे
Wednesday, 20 January 2021

कऱ्हाड सभेत जनशक्ती व भाजपच्या नगसेवकांत खडाजंगी झाली. त्यात सभेतील सूचना कोणी मांडायची यावरून वाद होता. त्या वादावरून गदारोळ झाला.

कऱ्हाड (जि. सातारा) : सूचना कोणी मांडायची यावरून जनशक्ती आघाडी व भाजपच्या नगरसेवकांत मागील सभेत झालेले मतभेद याही सभेत कायम राहिले. कालच्या विशेष सभेत दोन्हीकडील नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही आघाड्यांतील नगरसवेकांत अक्षरशः हमरीतुमरी झाली. त्यात सूचना वाचायला आमच्याकडे द्या, अन्यथा तुम्ही सूचना मांडा आम्ही त्याला अनुमोदन देतो, या भूमिकेवर जनशक्तीचे नेते राजेंद्र यादव ठाम राहिले. त्याच वेळी प्रशासनाने सूचना वाचाव्यात अशी भूमिका भाजपने घेतली. त्या भूमिकेला जनशक्तीसह लोकशाही आघाडीने जोरदार विरोध केला. त्यामुळे सभागृहात भाजपची कोंडी झाली. 

मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनीही नगरसेवकांनी सूचना वाचली पाहिजे, असे स्पष्ट केल्याने त्यावर पडदा पडला. त्यामुळे अल्प मतातील भाजपवर 148 विषयांच्या सूचना वाचण्याची वेळ आली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. पालिकेची सप्टेंबरनंतर 12 जानेवारीला होणारी पालिकेची मासिक सभा ठरावांचे कार्यालयीन अहवाल तयार नसल्याने तहकूब करण्यात आली होती. त्या सभेत जनशक्ती व भाजपच्या नगसेवकांत खडाजंगी झाली. त्यात सभेतील सूचना कोणी मांडायची यावरून वाद होता. त्या वादावरून गदारोळ झाला. त्या वेळी आम्ही सत्ताधारी आहे, आम्हीच सूचना मांडणार अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतली होती. मात्र, त्या वेळी तहकूब झालेली सभा खारीज करून काल पुन्हा विशेष सभा घेण्यात आली. त्यात जवळपास 148 विषय होते. त्यामुळे सभा बराच काळ चालणार अशी स्थिती होती. सभेत जनशक्तीने भाजपची कोंडी केली. जनशक्तीने बैठकीत सूचना मांडण्यास नकार दिला होता. मागील सभेत वाद झाल्याने कालच्या सभेतील सगळ्या सूचनांचे वाचन भाजपने करण्याची भूमिका जनशक्तीने घेतली. त्या वेळी पहिले तीन ठराव ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी वाचले. त्याला मंजुरी देण्यात आली. 

पिलीव घाटात सातारा-पंढरपूर बसवर दगडफेक; दरोड्याच्या अफवेने सातारा-सोलापूर पोलिसांची पळापळ

मात्र, त्यानंतर सूचना प्रशासनाने मांडावी. त्याला आम्ही अनुमोदन देतो, असे पावसकर व फारूक पटवेकर यांनी सूचवले. त्याला जनशक्तीसह लोकशाही आघाडीने विरोध केला. जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांची मते मांडली. त्यांना जयवंत पाटील, विजय वाटेगावकर, हणमंत पवार, स्मिता हुलवान, राजेंद्र माने, अतुल शिंदे यांनी साथ दिली. त्याच वेळी लोकशाही आघाडीने जनशक्तीच्या भूमिकेचा समर्थन करत विषय वाचण्यास सभागृहातील नगरसेवक सक्षम असताना प्रशासनाने विषय वाचायचे कारणच काय, असा प्रश्न विचारत त्यास थेट विरोध केला. जनशक्ती व लोकशाही आघाडीच्या विरोधामुळे भाजपची कोंडी झाली. आम्ही अल्पमतात आहे, म्हणून आमची कोंडी करत आहात, असा सवाल श्री. पावसकर यांनी केला. त्या वेळी श्री. यादव यांनी एकतर सगळ्या सूचना आम्ही मांडतो. तुम्ही अनुमोदन द्या अन्यथा तुम्ही वाचा आम्ही अनुमोदन देतो, अशी भूमिका घेतली. त्यामुळे भाजपची कोंडी झाली. त्यानंतर महिलांसाठी हळदी- कुंकू घेण्याच्या विषयावरून खडाजंगी झाली. तोही विषय महिला नगरसेविकांनी एकत्रित येऊन ठरवण्याचे ठरले. 

निवडणुकीची रणधुमाळी झाली थंड; आता सरपंच आरक्षणासाठी होणार बंड?

हुतात्मा स्मारक कऱ्हाडकडेच 

हुतात्मा स्मारकाच्या देखभाल दुरुस्ती व वाचनालयाच्या विषयावरून जनशक्ती, लोकशाही आघाडीने विरोधाची भूमिका घेतली. स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीला माणूस नेमण्याची पालिकेची कुवत नाही का, त्यामुळे मलकापूर पालिकेकडे ते वर्ग करत आहोत, हा प्रकार नको आहे, अशी भूमिका या वेळी नगरसेवकांनी मांडली. स्मारकाचा विषयाला विरोध करत तो विषय हाणून पाडला. त्यामुळे हुतात्मा स्मारक कऱ्हाड पालिकेकडेच राहणार आहे, असे स्पष्ट झाले. मलकापूरचे हद्दीबाबत व घुसखोरीबाबत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी स्वतंत्र विशेष सभा घ्या, अशी मागणी राजेंद्र यादव यांनी या वेळी केली. 

फलटण तालुक्‍यातील कोळकीत गुन्हेगारी, अवैध धंद्यांना चालना; सीसीटीव्ही बंदचा परिणाम

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political Marathi News Monthly Meeting In Karad Municipality