लोकशाहीचे नव्हे, तर हे ठोकशाहीचे राज्य; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

गिरीश चव्हाण
Saturday, 20 February 2021

जनतेच्या मतांचा अनादर करत तुम्ही सत्तेत बसला आहे. येत्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली.

सातारा : लोकशाहीचे नव्हे, तर ठोकशाहीचे हे राज्य असून, राज्यातील नामांकित व्यक्‍तींना केस करण्याची भीती दाखविण्यात येत आहे. हे राज्य तुमच्या घरचे नव्हे तर कायद्याचे आहे. लोक आता मतदानाची वाट बघत असून, भ्रमात न राहण्याचा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला. 

जनतेने तुम्हाला सत्ता दिली नव्हती. जनतेच्या मतांचा अनादर करत तुम्ही सत्तेत बसला आहे. येत्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, अशी टीकाही त्यांनी केली. अजिंक्‍यतारा किल्ल्याची खासदार उदयनराजेंसोबत पाहणी केल्यानंतर श्री. पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी भाजपचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. 

हे पण वाचा- थोडं फार होणारच! उदयनराजेंनी गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोडले मौन

श्री. पाटील म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने भाजपने हजारो गावांत शिव स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यापैकीच शिवगाण हा स्पर्धा कार्यक्रम आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी मोठा त्याग करत अजानसह इतर स्पर्धा आयोजित केल्या. शिवजयंतीला बंदी आणि सत्तेतील सहभागी एका पक्षाचा राज्याध्यक्ष हजारोंच्या उपस्थितीत मिरवणूक काढतो. त्याला बंदी नाही आणि शिवजयंतीला कशी?'' 

कोरोनाचे कारण सांगत अधिवेशन लांबवायचे राज्या सरकारचा प्रयत्न असून, आम्ही उपस्थित करणाऱ्या प्रश्‍नांना ते घाबरत आहेत. 

- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News BJP State President Chandrakant Patil Criticizes The State Government