ग्रामसभांना 31 मार्चपर्यंत स्थगिती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

प्रशांत घाडगे
Wednesday, 20 January 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे.

सातारा : राज्य शासनाने गेल्या आठवड्यात ग्रामसभेवरील स्थगिती उठविली होती. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक व कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामसभांच्या परवानगीचे आदेश मागे घेत 31 मार्चपर्यंत पुन्हा ग्रामसभांना स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत. 

मे-जून महिन्यांत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यास परवानगी नाकारल्याने बहुतांशी ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक केली होती. त्यानंतर काही प्रमाणात कोविड नियंत्रणात आल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्या निवडणुकांचा नुकताच निकाल लागला असून अद्यापही सरपंच, उपसरपंच व कार्यकारिणी अस्तित्वात न आल्याने प्रशासकांची नेमणूकही "जैसे थे' आहे, तरीही 26 जानेवारीला प्रशासकांनी ग्रामसभा घेणे बंधनकारक असल्याचे आदेश देण्यात आले होते.

ग्रेड सेपरेटरनंतर महामार्गावरील उड्डाण पुलाचे नामकरण; उदयनराजे समर्थकांचा प्रशासनाला आणखी एक दणका 

मात्र, एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतींचे अध्यक्षपद सांभाळणे प्रशासकांना शक्‍य होणार नाही. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. मात्र, गावोगावी ग्रामसभांचे आयोजन झाल्यास गर्दी होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, तसेच अद्यापही कोविडसदृश रुग्णांची संख्या आढळत असल्याने ग्रामसभांना स्थगिती देत असल्याचे आदेश ग्रामविकास विभागाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत. 

भाजपचे आमदारही आता खोटं बोलू लागलेत; राष्ट्रवादीच्या पवारांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News Postponement Of Gramsabha Till March 31 By The Administration