Satara : राजकीय शांतता ठरणार वादळापूर्वीची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेत शांतता, मात्र वादळापूर्वीची!

Satara : राजकीय शांतता ठरणार वादळापूर्वीची

पाटण : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारले आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार, विद्यमान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई त्या बंडात सहभागी असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरणात शांतता आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवरच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. त्यात यशराज देसाईंचा सक्रिय राजकारणातील प्रवेश हा देसाईंच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, देसाई गटाच्या कार्यकर्त्यांचे व्हायरल झालेले कॉल रेकॉर्ड, एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ लागलेले फलक आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची वेट अँड वॉचच्या भूमिकेची तालुक्यात चर्चा आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर त्याच दिवशी शिवसेनेचा एक गट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील रात्रीत गुजरातच्या सुरत शहरात दाखल झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. तालुक्यातील शिवसेनेचे आमदार व विद्यमान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या बंडात पहिल्या फळीत असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. शिवसेना विरुद्ध बंडखोर असा संघर्ष गुवाहाटी व मुंबईमधून चालला आहे. पुढे काय होईल ? हे सांगता येत नाही. मात्र, या दरम्यान लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केल्याने देसाई गटाचा बिनविरोधचा

मार्ग मोकळा झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंत्री देसाई यांचा व त्यांचे सुपुत्र यशराज देसाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. यशराज देसाई यांच्या उमेदवारीने त्यांचा सहकारातील राजकीय प्रवेश कागदावर आला. बिनविरोध निवडणूक आणि यशराज यांची सहकारातील एन्ट्री देसाई

गटाच्या या परिस्थितीतही जमेच्या बाजू आहेत.

मात्र, दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील बाजारपेठेतील चौकाचौकांत लागलेले फलक कोणी लावले? याबाबतीत संभ्रम आहे. फलकांवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असले तरी बंडखोर मंत्री देसाई यांचे छायाचित्र दिसत नाही. फलक लावणाऱ्याचे नावही नसल्याने आजही मंत्री देसाई व कार्यकर्ते सावध पवित्रा घेत असल्याचे दिसते.

मूळ शिवसैनिकांनी बैठक घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंत्री देसाई यांचे पारंपरिक विरोधक राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर वेट अँड वॉच भूमिकेवर आहेत. मंत्री देसाई, देसाई गट, शिवसैनिक आणि राष्ट्रवादी सर्वच शांत

असल्याने तालुक्यात राजकीय शांतता पसरलेली आहे. ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना? असा सामान्यांना प्रश्न पडला आहे.

कॉल रेकॉर्डमुळे देसाई गटाची डोकेदुखी

एकीकडे बिनविरोध निवडणूक आणि दुसरीकडे सोशल मीडियावर होणारा ट्रोल देसाईंना भविष्यात त्रासदायक ठरू शकतो. सुरतहून गुवाहाटी असा बंडखोर गटाचा प्रवास झाला. मात्र, नेहमी मीडियाला सामोरे जाणारे मंत्री देसाई विधान परिषद निवडणूक मतदानानंतर माध्यमांसमोर दिसले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. त्यातच देसाई यांच्या निष्ठावान दोन कार्यकर्त्यांमधील कॉल रेकॉर्ड सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. व्हायरल कॉल रेकॉर्ड देसाई गटाची डोकेदुखी वाढवणारा आहे.

Web Title: Satara Political Peace Before Storm Minister Desai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top