ढेबेवाडी खोऱ्यात आघाडीत बिघाडी; मुंबईकरांच्या भूमिकेकडे लक्ष

राजेश पाटील
Thursday, 14 January 2021

ढेबेवाडी खोऱ्यात तब्बल 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा) : राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक व संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आणि अनेक प्रमुख नेते मंडळींसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ढेबेवाडी खोऱ्यात तब्बल 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक गावांचा रिमोट कंट्रोल मुंबईत असल्याने गावचा गड अबाधित राखताना त्यावर मुंबईतून विरोधाची तोफ डागली जाऊ नये, याची काळजी गाव कारभाऱ्यांसह नेतेमंडळी घेताना दिसत आहेत.
 
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात नेहमीच निर्णायक भूमिका बजावणारे ढेबेवाडी खोरे प्रत्येक निवडणुकीमध्ये नेते मंडळींसाठी प्रतिष्ठेचा विषय बनते. यावेळच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकासुद्धा त्याला अपवाद नाहीत. पाटण तालुक्‍यात सध्या 107 ग्रामपंचायतींचे धूमशान सुरू आहे. त्यापैकी 27 ग्रामपंचायती एकट्या ढेबेवाडी भागातील आहेत.

नागठाणेत ग्रामपंचायतीची रणधुमाळी शिगेला; सोशल मीडियावरही निवडणुकीचे पडसाद

त्यातील सात ग्रामपंचायती पूर्णतः तर काही अंशतः बिनविरोध झाल्या असून, कुंभारगाव, काळगाव, जानुगडेवाडी, कुठरे, मोरेवाडी, धामणी आदी राजकीय संवेदनशील गावात ग्रामपंचायतीसाठी कांटे की टक्कर आहे. राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडी झालेली असली, तरी गावपातळीवर ते वारे वाहताना दिसत नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अन्य पक्षांचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी आपापल्या सोयीनुसार निवडणुकीतील लढतीचे नियोजन केलेले आहे. अनेक ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादीतच चुरशीची लढत आहे. जाहिरातींचे वेगवेगळे फंडे वापरत सोशल मीडियावर प्रचाराची धूम सुरू असल्याने ही निवडणूक आता केवळ त्या- त्या गावपुरती मर्यादित न राहता सगळीकडेच पोचल्याने उत्सुकता कमालीची वाढली आहे. 

शेऱ्यात भीमाशंकरला माऊलीचे कडवे आव्हान; तिरंगी लढतीने चुरस वाढली

दुखावलेले मुंबईकर अन्‌ अस्वस्थ गावकारभारी 
गावाकडच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका खूपच महत्त्वाची ठरते. अर्ज दाखल केल्यापासून नेतेमंडळी, उमेदवार व कार्यकर्ते मुंबईकरांच्या संपर्कात आहेत. लॉकडाउनच्या काळात मुंबईकर गावीच होते. एरवी मुंबईकरांच्या वाटेकडे डोळे लावून बसणाऱ्या गावकऱ्यांकडून कोरोनाच्या काळात क्वारंटाइन व अन्य बाबतीत आलेला अनुभव अनेक मुंबईकरांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावरही त्याबाबत चर्चा होताना दिसते आहे. त्यामुळे मुंबईकर नेहमीसारखे मोठ्या संख्येने मतदानासाठी गावी येणार का आणि आले तर काही सल मनात ठेऊन तर येणार नाहीत ना, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राजकीय गटतट बाजूला ठेवत वांझोळीकरांची बिनविरोधची गुढी; सलग दुसऱ्या वेळी निवडणुकीत एकमत

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Politics News Election For 27 Gram Panchayats In Dhebewadi Division