दहा वर्षांपूर्वी दोन मतांनी विजयी झालेल्या चुलतीचा पुतणी काढणार वचपा?; मंद्रुळहवेलीत हालचालींना वेग

विलास माने
Tuesday, 12 January 2021

मल्हारपेठ विभागातील बहुतांशी गावात देसाई गटाचाच दबदबा आहे. मल्हारपेठ, नारळवाडी आणि विहे ग्रामपंचायतींचा अपवाद वगळला तर या विभागात देसाई गटाची चांगली पकड दिसून येते. विभागातील उरुल, ठोमसे आणि बोडकेवाडीतही देसाई गटाचीच सत्ता आहे.

मल्हारपेठ (जि. सातारा) : विभागातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई-पाटणकर गटांतच कॉंटे की टक्कर सुरू आहे. मंद्रुळहवेली आणि ठोमसेत जोरदार लढत होत असून, ठोमसेत एक जागा बिनविरोध करत पाटणकर गटाने विजयाचे खाते खोलले आहे. सहा जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून, तर मंद्रुळहवेलीतही सत्ताबदलाच्या हालचालींना वेग आलेला आहे. बोडकेवाडीतही पाटणकर गटाच्या आशा पल्लवित आहेत. ठोमसेत पुन्हा दहा वर्षांनी चुलती विरोधात पुतणीचा सरळ सामना रंगणार आहे. दहा वर्षांपूर्वी अवघ्या दोन मतांनी विजयी झालेल्या चुलतीचा पुतणी वचपा काढणार का, अशी चर्चा विभागात आहे. 

विभागातील बहुतांशी गावात देसाई गटाचाच दबदबा आहे. मल्हारपेठ, नारळवाडी आणि विहे ग्रामपंचायतींचा अपवाद वगळला तर या विभागात देसाई गटाची चांगली पकड दिसून येते. विभागातील उरुल, ठोमसे आणि बोडकेवाडीतही देसाई गटाचीच सत्ता आहे. मंद्रुळहवेलीमध्येही देसाई गटाचा बोलबाला आहे. गत पाच वर्षांपासून ठोमसे, बोडकेवाडी आणि मंद्रुळहवेलीत देसाईंच्या माध्यमातून कोटींची विकासकामे पूर्ण झाली आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांतही देसाई गटाने आपला करिष्मा अबाधित ठेवला आहे. यामुळे आगामी तीन ग्रामपंचायतींची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. पाटणकर गटाने विभागातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर केल्यामुळे आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांतही सत्तापरिवर्तनासाठी कंबर कसली आहे.

चाफळात पाटणकर-देसाई गटांत झुंज; आठपैकी सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने

दरम्यान, ठोमसेत गेल्या दहा वर्षांपासून पाटणकर गटाला अगदी पाच ते दहा मतांनी सत्तेपासून बाहेर बसावे लागले आहे. दोन्ही गटांचे दोन वॉर्ड हे बालेकिल्ले असले तरी वॉर्ड क्रमांक दोन मधील विजयी उमेदवारच सत्ता स्थापनेची गणिते स्पष्ट करत असल्याने दोन्ही गटांकडून वॉर्ड क्रमांक दोनकडे लक्ष केंद्रित केले आहे. पाटणकर गटाने वॉर्ड क्रमांक तीनमधून एक जागा बिनविरोध करत विजयाचे खाते खोलले आहे. ज्योतिर्लिंग वॉर्डमधून माजी सरपंच दयानंद शिलवंत बिनविरोध निवडून गेले. मंद्रुळहवेलीतही सात पैकी एक जागा आरक्षित उमेदवार न मिळाल्याने सहा जागांसाठी 12 उमेदवार नशीब अजमावणार आहेत. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तेपासून बाहेर राहिलेल्या पाटणकर गटाने चांगलीच कंबर कसली आहे. यामुळे तीनही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत देसाई आणि पाटणकर गट अशी कॉंटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटांतील पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे.

शिखर शिंगणापुरात चौरंगी लढत; राजकीय वर्चस्वासाठी मातब्बर उमेदवारांत चुरस  

पाटणकर गटातून जिल्हा युवक अध्यक्ष शंकर शेडगे, तालुकाध्यक्ष गुरू शेडगे, विहेचे अविनाश पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य पी. एल. माने भेटी देत आहेत. देसाई गटातून जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर यांनी गण आणि गटातील भेटीगाठींना जोर लावला आहे. एकंदरीत मल्हारपेठ विभागातील देसाई गटाच्या बालेकिल्ल्यातून मल्हारपेठ, मारुलहवेली, विहे, बहुले ही मोठी गावे निसटलेली असून, आगामी निवडणूक असणाऱ्या गावांची सत्ता अबाधित ठेवणार, की बालेकिल्ल्याला पुन्हा सुरुंग लागणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 

राणंद ग्रामपंचायतीत कॉंटे की टक्कर; आमचं ठरलंय विरुद्ध भाजपात जोरदार रस्सीखेच

गावकारभाऱ्यांच्या निवडीबाबत संभ्रमावस्था 

सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर समजले जाणार असले तरी मागील दोन पंचवार्षिक असलेले आरक्षण वगळून असणाऱ्या उमेदवारांची सरपंचपदासाठी सोडत निघणार असल्याने दोन्ही गटांत गावकारभाऱ्यांच्या निवडीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, अशा तिढ्यामुळे सरपंचपदासाठी सोडत निघणारे उमेदवार देताना खर्चासाठी कार्यकर्त्यांच्या खिशाला चाट बसणार आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Politics News Election For Six Seats Of Malharpeth Gram Panchayat