सातारा : जिल्हा बॅंकेसाठी आज मतदान; कऱ्हाड, जावळी, पाटणमध्ये चुरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

सातारा : जिल्हा बॅंकेसाठी आज मतदान; कऱ्हाड, जावळी,पाटणमध्ये चुरस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी संचालकांच्या १० जागांसाठी उद्या (रविवारी) जिल्ह्यातील ११ केंद्रांवर मतदान होत आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कऱ्हाड, जावळी व पाटणमध्ये चुरस असल्याने तेथे मतदान केंद्राच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सहकार विभागाने आज ९७ कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप केले.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत संचालकांच्या २१ जागांपैकी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी व भाजपचे मिळून ११ संचालक बिनविरोध झाले. त्यामुळे उर्वरित दहा जागांसाठी २० उमेदवार रिंगणात असून, त्यासाठीची मतदान प्रक्रिया उद्या (रविवारी) ११ केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच या दरम्यान होत आहे. मतदानासाठीची सर्व तयारी सहकार विभागाने पूर्ण केली असून, आज दिवसभर मतदानासाठी नेमलेल्या ९७ कर्मचाऱ्यांना तिसरे प्रशिक्षण देऊन मतदानासाठी लागणाऱ्या साहित्यासह केंद्रांकडे रवाना करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

हेही वाचा: कोल्हापूर: मानाच्या तुकाराम माळी मंडळाच्या गणपतीचे विसर्जन; पाहा PHOTO

संचालकांच्या दहा जागांपैकी कऱ्हाड, पाटण, जावळी, खटाव, माण व कोरेगाव या सहा सोसायटी मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलच्या उमेदवारांपुढे विरोधी उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. त्यामध्ये कऱ्हाडात सहकारमंत्री बाळासाहेब पाटली यांच्या विरोधात उंडाळकर काकांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील, पाटणमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यापुढे सत्यजितसिंह पाटणकर, जावळीत आमदार शशिकांत शिंदेंना राष्ट्रवादीच्याच ज्ञानदेव रांजणे यांनी आव्हान उभे केले आहे. माणमध्ये मनोजकुमार पोळ यांच्यापुढे शिवसेनेचे नेते शेखर गोरे, खटावमध्ये प्रभाकर घार्गेंविरोधात नंदकुमार मोरे, कोरेगावात शिवाजीराव महाडिक यांच्याविरोधात सुनील खत्री यांचे आव्हान आहे. नागरी बॅंका व पतसंस्था मतदारसंघात रामभाऊ लेंभे यांच्याविरुद्ध सुनील जाधव, ओबीसी प्रवर्गातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते विरुद्ध शेखर गोरे आणि महिला राखीवच्या दोन जागांसाठी सहकार पॅनेलच्या कांचन साळुंखे व ऋतुजा पाटील यांच्याविरोधात शारदादेवी कदम, चंद्रभागा काटकर यांचे आव्हान आहे.

हेही वाचा: शिवसेनेला डावलले : पालकमंत्री राऊत यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मतदानासाठी चार प्रकारच्या मतपत्रिका

जिल्हा बॅंकेचे एकूण एक हजार ९६४ मतदार असून, सोसायटीसह तीन राखीव जागांसाठी मतदारांना चार मते देण्याचा अधिकारी असेल. बॅंका व पतसंस्था मतदारसंघासाठी मतदारांना चार मते देता येतील. सोसायटी बिनविरोध झालेल्या तालुक्यातील मतदारांना तीनच मते द्यावी लागणार आहेत. एकूण चार प्रकारच्या मतपत्रिका असून, पांढरी मतपत्रिका सोसायटीसाठी, गुलाबी मतपत्रिका महिला राखीवसाठी, ओबीसीसाठी पिवळ्या रंगाची, तर नागरी बॅंका व पतसंस्था मतदारसंघासाठी फिकट हिरवी मतपत्रिका असेल.

loading image
go to top