सातारा : जिल्ह्यात POP मूर्तींना बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav

सातारा : जिल्ह्यात POP मूर्तींना बंदी

सातारा : जिल्ह्यातील शहरी, तसेच ग्रामीण भागांमधील जल, वायू प्रदूषणामध्ये वाढ होऊ नये, याकरिता प्‍लॅस्‍टर ऑफ पॅरिसपासून बनविण्‍यात येणाऱ्या सर्व प्रकारच्‍या मूर्तीच्‍या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्‍यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांनी केंद्र सरकारच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत.

प्‍लॅस्‍टर ऑफ पॅरिसचे पाण्‍यात विघटन होण्‍यास अवधी लागत असल्‍याने, तसेच त्‍यामुळे जलस्‍त्रोत दूषित होत असल्‍याच्‍या अनेक तक्रारी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे यापूर्वी दाखल झाल्‍या होत्‍या. या तक्रारींची दखल घेत, तसेच जल आणि वायू प्रदूषणाचा आढावा घेत केंद्र शासनाने प्‍लॅस्‍टर ऑफ पॅरिसपासून कोणत्‍याही प्रकारच्‍या मूर्ती बनविण्‍यास मनाई करण्‍याबाबतचा आदेश जाहीर केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी येत्‍या ता. ६ जुलैपासून सर्वत्र करण्‍यात येणार आहे. दोन महिन्‍यांवर गणेशोत्‍सव येऊन ठेपला असून, या निर्णयामुळे कुंभार समाजाचे मोठे नुकसान होणार आहे.

यामुळे कुंभार समाजाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्‍यापूर्वी म्‍हणणे लक्षात घेण्‍याचे, तसेच प्‍लॅस्‍टर ऑफ पॅरिसला पर्याय देण्‍याची मागणी निवेदनाद्वारे जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. या मागणीबाबत निर्णय प्रलंबित असतानाच जिल्‍हाधिकारी सिंह यांनी प्‍लॅस्‍टर ऑफ पॅरिसच्‍या मूर्तीनिर्मिती व विक्रीवर बंदी जाहीर केली आहे. यानुसार मूर्तिकारांकडे पीओपीपासून ज्‍या मूर्ती बनविल्‍या असतील, त्‍या विकण्‍यासाठी ता. ५ जुलैपर्यंत अंतिम मुदत दिली आहे.

होणार दंडात्‍मक कारवाई

प्‍लॅस्‍टर ऑफ पॅरिसपासून सर्व प्रकारच्‍या मूर्ती बनविणे, विक्रीवर मनाई करण्‍यात आली आहे. याची अंमलबजावणी ता. ६ जुलैपासून होणार आहे. त्‍यापूर्वी उपलब्‍ध मूर्तींची विक्री करण्‍यासाठीची मुदत मूर्तिकारांना देण्‍यात आली आहे. यानंतर एखाद्या मूर्तिकाराकडे पीओपीची मूर्ती आढळल्‍यास मूर्ती जप्‍त करण्‍याबरोबरच संबंधितांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येणार आहे. यासाठी स्‍थानिक प्रशासन, पोलिस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक तयार करण्‍यात येणार आहे.

Web Title: Satara Pop Idols Banned District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..