लॉकडाउनमध्ये वीजेचा वारंवार शटडाऊन!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. माण तालुक्‍यातील गोंदवले बुद्रुकमध्ये वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्याने गोंदवलेकर हैराण झाले आहेत. 
 

गोंदवले (जि. सातारा) : कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन शिथिल होत असतानाच विजेचा वारंवारचा शटडाऊन आता अडचणींचा बनले आहे. दहिवडी हद्दीत वारंवार तांत्रिक अडचण होत असल्याचे सांगितले जात असले तरी विजेअभावी गोंदवलेकर मात्र पुरते हैराण झाले आहेत. 

तीर्थक्षेत्र असलेले गोंदवले बुद्रुक हे परिसरातील चांगली बाजारपेठ आहे. आजूबाजूच्या वाड्यावस्त्या व खेडेगावांतील लोकांसाठी ही बाजारपेठ जवळची असल्याने व्यापारासाठी चालना मिळत आहे. बहुतांश कारणांसाठी येथे विजेची नितांत आवश्‍यकता असते. शेतीसह इंटरनेट सेवा, बॅंका, एटीएम सेंटर, विद्युत उपकरण दुरुस्ती व विक्री यासारख्या अनेक बाबींसाठी वीज अत्यावश्‍यक बनली आहे. किंबहुना लोकांच्या मूलभूत गरजेप्रमाणेच आता विजेची गरज भासत असते. 
कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांत सर्वच ठप्प झाले होते. त्यामुळे केवळ घरगुती वापरासह इंटरनेट व इतर काही कारणांसाठीच विजेचा वापर होत होता. व्यवसाय बंद आल्याने विजेची मागणीदेखील मोठ्या प्रमाणात घटली होती. परंतु, आता हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असतानाच विजेची मागणीही वाढू लागली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून खोळंबलेल्या कामांसाठी विजेची गरज असतानाच मात्र सध्या गोंदवले बुद्रुकमध्ये दिवसातील काही तासच वीज उपलब्ध होत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रोजच दिवसभर आणि रात्रीही उशिरापर्यंत वीज गायब होत आहे. परिणामी लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विजेअभावी पिण्याच्या पाण्याची चांगलीच गैरसोय होत आहे. याशिवाय लॉकडाऊननंतर उद्योग सुरू झाल्याने आर्थिक उलाढालदेखील विजेअभावी पुन्हा ठप्प होत आहे. 

याबाबत संबंधित विभागाकडे विचारणा केली असता पाऊस व वाऱ्यामुळे वीज पुरवठ्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, परिसरात अद्याप मोठा वारा व पाऊस झाला नसतानाही वारंवार वीज गायब होत असल्याने लोक हैराण झाले आहेत. 

गोंदवल्याकडे येणाऱ्या वीज वाहिनीमध्ये दहिवडी हद्दीत वारंवार तांत्रिक अडचण निर्माण होत असल्यानेच गोंदवल्यात वीज बंद राहत आहे. 

- राहुल सानप, शाखाधिकारी, वीज वितरण कंपनी, गोंदवले 

 

कांद्याचा भार आता एसटी पेलणार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Power Off shutdown in lockdown!