Satara : ‘प्राधान्य, अंत्योदय’ना मोफत धान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ration

Satara : ‘प्राधान्य, अंत्योदय’ना मोफत धान्य

सातारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदयचे एक लाख १९ हजार ३६९ प्राधान्य कुटुंबाचे १५ लाख ५३ हजार ६२५ अशा एकूण १६ लाख ७२ हजार ९९४ शिधापत्रिकेवरील पात्र लाभार्थ्यांना एक जानेवारीपासून मोफत धान्य वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना नववर्षाच्या सुरुवातीपासून मोफत धान्याचा लाभ मिळू लागला आहे.

देशात प्रत्येक व्यक्तींला दोन वेळचे जेवण मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना सध्याच्या शासन धोरणानुसार जिल्ह्यातील पात्र प्राधान्य कुटुंबात प्रतिलाभार्थी दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ, तर अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना प्रतिकार्ड कुटुंबास १५ किलो गहू व २० किलो तांदूळ पूर्णत: मोफत देण्यात येणार आहे. यापूर्वी २०२० पासून आतापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत रेशन वितरित केले जात होती.

याची मुदत नुकतीच एक डिसेंबरला संपली आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत नवीन वर्षात लाभार्थ्यांना आता वर्षभर अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून मोफत गहू आणि तांदूळ मिळणार आहे. जिल्ह्यातील सुमारे दोन हजार २०० रेशन दुकानांमध्ये महिन्याला एकूण आठ हजार ४९५ मेट्रिक टन गहू व तांदूळ अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे.

बायोमेट्रिक प्रमाणीकरण

जिल्ह्यात रेशन दुकानांचे व लाभार्थ्यांचेही पीओएस म्हणजे बायोमेट्रिक प्रमाणीकरण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात किती व्यक्ती असून, लाभार्थी कुटुंब कोणती? याची तंतोतंत माहिती मिळत आहे. लाभार्थ्यांनीही अन्नधान्य घेताना गहू व तांदूळ तपासून घ्यावे. कुठलीही शंका असल्यास तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी एक जानेवारीपासून लाभार्थ्यांना मोफत गहू आणि तांदूळ वाटप सुरू झाले आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेऊन मिळणाऱ्या अन्नधान्याची तपासणी करून खात्री करावी.

— स्नेहा किसवे- देवकाते, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा.