
सातारा : बांधकाम साहित्यांचे दर वाढल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला
सातारा : बांधकाम साहित्यांचे दर वाढल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे, तसाच तो बांधकाम विभागाच्या विविध कामांनाही बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या विविध ४० ते ५० कामांवर परिणाम होऊन या कामांचा वेग मंदावला आहे. आता वाढलेल्या दराप्रमाणे निविदेच्या रकमेतील फरक मिळावा, असा आग्रह ठेकेदारांनी धरला आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव आता शासन दरबारी पाठविला जाणार असून, मुख्य अभियंत्यांची समिती त्यावर शासनाला अभिप्राय कळविणार आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध शासकीय इमारतींसह इतर कामे केली जातात. सध्या जिल्ह्यात बांधकाम विभागाची इमारतीसह इतर पुलांची सुमारे १५० ते १७५ कामे सुरू आहेत; पण गेल्या महिनाभरापासून बांधकाम साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा परिणाम या कामांवरही झाला आहे. ज्या दराने निविदा घेतली होती. त्यातून ही कामे करताना ठेकेदारांचा तोटा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४० ते ५० कामांवर परिणाम झाला असून, या कामांचा वेग मंदावला आहे. सिमेंटच्या दरात ३० टक्क्याने, तर स्टिलच्या दरात ४० टक्क्याने वाढ झाली आहे.
शासनाकडे प्रस्ताव पाठवणार
वाढलेल्या दराप्रमाणे फरकाची रक्कम संबंधित ठेकेदारांना मिळावी, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी अधिकाऱ्यांनी केली आहे. या प्रस्तावावर मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखालील समिती त्यावर आपला अभिप्राय शासनाला देते. त्यानंतरच शासन फरकाची रक्कम देण्याबाबतचा विचार करणार आहे. त्यामुळे एकूणच बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या दराचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे.
Web Title: Satara Prices Construction Materials
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..