मल्हारपेठ परिसरात खासगी ओपीडीला मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

कोरोनाच्या भितीमुळे ग्रामीण भागातील अनेक खासगी दवाखाने बंद केले आहेत. त्यामुळे किरकोळ आजारी रुग्णांना उपचार घेताना अनेक अडचणी येत होत्या. त्याची शासनाने दखल घेतली. आरोग्यमंत्र्यांनी परवाना रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतर आता ग्रामीण भागातील  काही खासगी डॉक्‍टरांच्या ओपीडी सुरु झाल्या आहेत. 

मल्हारपेठ (जि. सातारा) ः कोरोनाच्या भीतीमुळे खासगी दवाखान्यांचे शटर डाउन असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करत विभागातील खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने उघडल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही राज्यात तातडीने भरती केल्याने पाटण तालुक्‍यातील अनेक खासगी डॉक्‍टरांना संधी मिळाली आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पुणे, मुंबई कनेक्‍शनची प्रचिती रुग्ण सापडल्याने दिसू लागली आहे. सुरवातीच्या टप्प्यात कऱ्हाड तालुक्‍यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. मात्र, चौथ्या लॉकडाउनच्या पूर्वार्धात संचारबंदीची शिथिलता मिळाल्याने जिल्ह्यात पुण्या-मुंबईचे बहुतांश नागरिक गावांकडे परतले. ढेबेवाडी, मोरगिरी, पाटण खोऱ्यात सापडलेल्या रुग्णांमध्ये मुंबई, पुणे कनेक्‍शन असल्याचे बाधितांच्या आकडेवारीवरून दिसते. सध्या पाटण, तळमावले येथे बाधितांच्या नातेवाईकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यातीलच बहुतांशी पॉझिटिव्ह येत असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, तब्बल दोन महिन्यांपासून कोरोनाच्या भीतीने तालुक्‍यातील बहुतांशी खासगी डॉक्‍टरांचे शटर डाउन होते. त्यामुळे अन्य आजाराच्या रुग्णांना घरातच थांबावे लागत होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदांद्वारे राज्यातील खासगी दवाखाने, हॉस्पिटल्स सुरू करण्याचे आदेश दिले. दवाखाने सुरू न करण्याऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधित नोंदणीकृत दवाखान्यांच्या डॉक्‍टरांना लेखी आदेश कळवून दवाखाने सुरू करून सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सूचित केले. विभागात त्याची अंमलबजावणी होताना दिसते. बाधित सापडल्याने नवारस्ता येथील खासगी दवाखाने तूर्तास बंद आहेत. मात्र, येथील सर्व आरोग्य विभागाची टीम, खासगी डॉक्‍टर्स काम करत आहेत. 

कसल्याही कठीण काळात रुग्णांवर उपचार करू. परंतु, शासनानेही डॉक्‍टर्स, नर्सेसना आवश्‍यक बाबी पुरविल्या पाहिजेत. जिवाची पर्वा न करता देशहितासाठी सेवेत तत्पर राहू. डॉक्‍टर, नर्संना बाधित होण्याचा धोका असला तरीही प्रतिबंधात्मक साधने उपलब्ध केल्यास काही अडचणी येणार नाहीत. 

- डॉ. विलास सूर्यवंशी, मल्हारपेठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara private OPD in Malharpeth area as start