
सातारा : पुणे येथील कचरा डेपोतील जैव वैद्यकीय कचऱ्याचे विघटन करणाऱ्या प्रकल्पातील मशिनरींच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे पुणे शहर हद्दीतील जैववैद्यकीय कचरा सध्या सातारा शहराच्या डेपोत येत आहे. यावरून सातारकरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत, तर पालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या परवानगीनेच हा कचरा पुण्यातून साताऱ्यात विघटनासाठी आणला जात असल्याचे पालिकेचे अधिकारी व प्रकल्पाचे अधिकारी सांगत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत आहे. अशातच पुणे, मुंबईहून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत पुणे शहरातील जैव वैद्यकीय कचरा आता सातारा पालिकेच्या कचरा डेपोत टाकण्यासाठी आणला जात आहे. रात्री दोन गाड्या कचरा डेपोत दाखल झाल्या. त्यामुळे साताऱ्यातील काही नागरिकांनी यास आक्षेप घेतला. कचरा डेपोतून होणारे प्रदूषण आणि त्यातच पुण्यातून जैव वैद्यकीय कचरा साताऱ्यात येऊ लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. काहींनी याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रारी केल्या. मात्र, खरी परिस्थिती वेगळीच आहे.
पुण्यातील पास्को इनवॉयरमेंटल सोल्युशन प्रा. लि. कंपनीकडे पुणे शहरात निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा विघटन करण्याचे काम आहे. सध्या त्यांच्या या प्रकल्पातील मशिनरीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील जैव वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात पडून आहे. हा कचरा विघटन करण्यासाठी त्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाची परवानगी घेऊन साताऱ्यातील प्रकल्पात हा कचरा आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही पत्र दिले आहे. साताऱ्यात नेचर इन निड ही सामुदायिक जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प चालवित आहे. या संस्थेकडे पुण्यातील पास्को इनवॉयरमेंटल्स सोल्यूशन कंपनीने पत्र पाठवून त्यांच्या प्रकल्पात पुण्यातील वैद्यकीय कचरा पाठवत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा पुण्यातील वैद्यकीय कचरा साताऱ्यातील प्रकल्पात विघटनासाठी येत आहे. मात्र, साताऱ्यातील नागरिकांनी याला आक्षेप घेण्यास सुरुवात केल्याने नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कचऱ्यातून आणखी काही समस्या निर्माण होण्याची भीतीही नागरिक व्यक्त करत आहेत.
यासंदर्भात साताऱ्यातील नेचर इन निड या प्रकल्पाच्या अधिकारी सुनीता कदम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुण्यातील प्रकल्पात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तेथील कचरा साताऱ्यातील प्रकल्पात विघटनासाठी आणला जात आहे. रात्री दोन गाड्या आल्या असून, आणखी दोन गाड्या कचरा घेऊन येणार आहेत. यासाठी आम्ही प्रदूषण नियंत्रण महामंडळाची परवानगी घेतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दहावीनंतर काय? विनामुल्य वेबिनारचे आयोजन
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार : जिल्हाधिकारी सिंह
यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण आहेत डिस्टर्ब
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.