युवकांचा सवाल... रोजगारासाठी किती दिवस धरायचा मुंबईचा रस्ता?

जालिंदर सत्रे
Friday, 24 July 2020

तामकडेच्या हद्दीत 11 हेक्‍टर क्षेत्रावर लघु औद्योगिक वसाहतीची सुरु झाली. या वसाहतीत एकूण 35 प्लॉट असून, त्यापैकी 34 प्लॉटचे वाटप करण्यात आले. सध्या 10 प्लॉटमध्ये उत्पादन सुरू आहे. कार्यरत तीन प्रकल्प सोडले, तर नवीन उद्योग येत नाही. त्यामुळे पाटण तालुक्‍यातील युवकांना रोजगारासाठी मुंबईची वाट धरावी लागत आहे. 

पाटण (जि. सातारा) ः इको सेन्सेटिव्ह झोन व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे उभारी घेत असलेला पर्यटन व्यवसाय अखेरच्या घटका मोजत आहे. पाटण तालुका भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने तामकडे लघु औद्योगिक वसाहतीत उद्योजक येत नाहीत. सुशिक्षित तरुणांना रोजगार नसल्याने मुंबईचा रस्ता धरावा लागत आहे. रोजगार निर्मितीच्या नावाने तालुक्‍यात दुष्काळच पाहावयास मिळतो. 

तामकडेच्या हद्दीत कोयना नदीच्या तीरावर कऱ्हाड-चिपळूण महामार्गाशेजारी 11 हेक्‍टर क्षेत्रावर लघु औद्योगिक वसाहतीची सुरुवात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी 30 वर्षांपूर्वी केली. वीज, पाणी व रस्ते या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. या वसाहतीत एकूण 35 प्लॉट असून, त्यापैकी 34 प्लॉटचे वाटप करण्यात आले. सध्या 10 प्लॉटमध्ये उत्पादन सुरू आहे. 

श्री. पाटणकर यांनी उभारलेला कोयना ऍग्रो, श्रीराज पेंट्‌स व शालिनी फायटो फार्मा प्रकल्प सुरू होता. मात्र, नाना गुरव यांचे अकाली निधन झाल्याने शालिनी फायटो फार्मा प्रकल्पालाही मर्यादा आल्या आहेत. अमरसिंह पाटणकर यांनी उभारलेला रघुनंदन बेकरी उद्योग व विक्रमबाबा पाटणकर यांचा नट्‌स ऍण्ड ऍग्रो बंद पडले. 

प्रकल्प उभारले नाहीत म्हणून एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी काही प्लॉट परत घेतले आहेत. कार्यरत तीन प्रकल्प सोडले, तर नवीन उद्योग येत नाही. विक्रमसिंह पाटणकर यांनी एक प्रकल्प उभारला. मात्र, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नवीन प्रकल्प उभा करण्याबाबत किंवा उद्योजकांना आणण्याबाबत दुर्लक्ष केल्याचे दिसते. 

तालुक्‍यात वाढदिवस साजरा करण्यासाठी व विधानसभा आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक मेळावे घेतले जातात. मात्र, वाढदिवस व निवडणुका संपल्यानंतर रोजगाराबाबत शून्य प्रयत्न आणि पुन्हा निवडणुकीची बिगुल वाजला, की युवक मेळावे ही परंपरा गेली अनेक वर्षे सुरू आहे. 

युवक मेळावे घेऊन प्रश्‍न सुटणार? 
सत्ता नाही म्हणून पाटणकरांचे दुर्लक्ष, तर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा चाकोरीबद्ध विकास पाहावयास मिळतो. हे चित्र युवकांच्या हाताला काम देईल, असे वाटत नाही. युवक मेळावे घेऊन हा प्रश्न सुटणार नाही, याची आता युवकांनीच नेते मंडळींना जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

पवारसाहेबांना विचारा ते समाेरच हाेते; चुकीच्या गाेष्टींना मी थारा देत नाही 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The question of the youth ... How many days to take the road to Mumbai for employment?