Rahul Gandhi : राहुल गांधी देणार प्रतापगडला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधी देणार प्रतापगडला भेट

निमसोड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विलक्षण बुद्धिचातुर्य व अतुलनीय शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ले प्रतापगडास देशाचे नेते, खासदार राहुल गांधी नजीकच्या काळात भेट देणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व हरणाई सहकारी सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवासात राहुल गांधी राज्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवर्जून भेटले. त्यांच्याकडून राहुल गांधींनी राज्यातील संघटनात्मक, राजकीय व सामाजिक विषय समजून घेतले. महाराष्ट्राची संस्कृती व विचारधारा याविषयांवरही राहुल गांधींनी अभ्यासकांकडून माहिती घेतली. रणजितसिंह देशमुख भारत जोडो यात्रेच्या नियोजन व अंमलबजावणी कामातील सक्रिय पदाधिकारी होते.

या दरम्यान, राहुल गांधींशी त्यांचा अनेकदा संपर्क झाला. भारत जोडो यात्रेच्या अंतिम टप्प्यात रणजितसिंह देशमुख यांनी राहुल गांधींना प्रतापगड भेटीचे लेखी निमंत्रणही दिले. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केल्याचे राहुल गांधींना सांगून नेहरूंनी प्रतापगडला दिलेल्या ऐतिहासिक भेटीचे उमटलेले दीर्घकालीन पडसादही त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

राहुल गांधींनी प्रतापगड भेटीचे निमंत्रण स्वीकारले असून, भारत जोडो यात्रेच्या समारोपानंतर या भेटीची वेळ निश्चित केली जाणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.प्रतापगड किल्ल्याला भेट, तेथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन, भवानी देवीचे दर्शन आदी कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

टॅग्स :Rahul GandhiFortPratapgad