पाऊस, किडीमुळे "राजमा' धोक्‍यात; काढणी सुरू असताना पावसाने हजेरी

Satara
Satara

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : ऑगस्ट महिन्यातील संततधार पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावाने कोरेगाव तालुक्‍यातील "राजमा' अर्थात घेवडा पीक यंदा धोक्‍यात आला आहे. त्यातच काढणी सुरू असताना पावसाने दमदार हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेले पीक मातीत गेले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

कोरोनामुळे ग्रामीण अर्थकारण बिघडून गेलेले असताना आता निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. तालुक्‍याच्या उत्तर भागात खरीप हंगामात घेवडा पीक घेतले जाते. सोबतीला वाटाणा, बटाटा, सोयाबीन आणि कडधान्ये केली जातात. घेवड्यामुळे कोरेगावची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झाली आहे. या पिकातून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकाला बसत असून, शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून गेले आहे.

या वर्षी वळीव पाऊस लवकर झाल्याने मशागती वेळेवर उरकून जूनच्या अखेरीस पेरण्या झाल्या. पाऊस अधूनमधून हजेरी लावत राहिला. त्यामुळे सर्वच पिके जोमात आली. शेतकऱ्यांनी कोळपणी आणि खुरपणी केली. औषध फवारणी झाली. ऑगस्ट महिन्यात मात्र सततच्या पावसाने घेवडा व वाटाणा पीक अडचणीत आले. अनेक ठिकाणी शेतात पाणी साठू लागल्यामुळे पिके कुजून गेली. त्यावर किडीचा मोठा प्रादुर्भाव झाला. सध्या घेवडा काढणीची धांदल सुरू आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे घेवडा भिजून मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. घेवड्याला गत दोन वर्षांपूर्वी जागतिक मानांकन मिळाले आहे. सुरू हंगामात भारत- चीन तणावामुळे चीनचा घेवडा येणार, की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे घेवडा भाव खाऊन जाणार असे वाटत होते. मात्र, शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे. व्यापारी घेवड्याला सध्या प्रतिनुसार 4500 ते 5500 रुपये दर देत आहेत. 


पीक विम्यात घेवड्याचा समावेश करा 

जागतिक बाजारपेठेत पोचलेल्या घेवड्याचा समावेश पीक विम्यात नसल्याने नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर शासनाने घेवडा पिकाचा समावेश पीक विम्यात करावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com