esakal | कोरेगावकरांचा आमदार महेश शिंदेंना दणका : पदाचा रुबाब कराल तर विरोधाची भूमिका

बोलून बातमी शोधा

राजाभाउ जगदाळे महेश शिंदे

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करणे, ही काळाची गरज आहे. मात्र, काही दिवसांपासून अधिकाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यात भर म्हणून राज्यमंत्र्यांना बरोबर घेऊन दमदाटी करण्याचा प्रयत्न काल (बुधवार) झाला. यापुढे पदाचा असा रुबाब दाखवत राहिलात तर विरोधाची भुमिका घेतली जाईल, अशा शब्‍दात आमदार महेश शिंदे यांचा नामोल्‍लेख टाळून पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी आपले मत व्‍यक्‍त केल्‍याने अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत. 

कोरेगावकरांचा आमदार महेश शिंदेंना दणका : पदाचा रुबाब कराल तर विरोधाची भूमिका
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव, (जि. सातारा) : एखादा अधिकारी चुकत असल्यास समजावून सांगून, विश्वासात घेऊन कामे करून घेण्याची क्षमता लोकप्रतिनिधींकडे असणे गरजेचे आहे; परंतु काल (बुधवार) आढावा बैठकीदरम्यान झालेल्या प्रकारामुळे अधिकाऱ्यांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा लोकांच्या कामांवर व प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे दबाव टाकण्याचे चुकीचे काम करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास राज्यातील सत्तेमध्ये आम्ही एकत्र असलो, तरी चुकीच्या गोष्टींना वेळप्रसंगी विरोध करण्याची भूमिका आम्हाला नाईलाजाने घ्यावी लागेल, असा इशारा कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी पत्रकाद्वारे आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळून दिला आहे. 

अधिकाऱ्यांना दमबाजी करून दबाव निर्माण करण्यापेक्षा विश्वासाने काम करावे, असे नमूद करून सभापती जगदाळे यांनी पत्रकात म्हटले आहे, की विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारकडून सामान्य लोकांसह शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला दोन आमदार मिळाले आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा कायापालट व्हावा, अशी अपेक्षा लोकांची आहे. सरकारची धोरणे व योजना प्रामाणिकपणे राबवण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्याशी चर्चा, विनिमय करून विकासाचा गाडा पुढे नेणे गरजेचे आहे.

मागील दहा वर्षांमध्ये लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील विकासकामे करताना अधिकाऱ्यांशी सौहार्दाची भूमिका घेऊन व त्यांना विश्वासात घेऊन विकासकामे करून घेतली. आता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करणे, ही काळाची गरज आहे. मात्र, काही दिवसांपासून अधिकाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ आहेत. त्यात भर म्हणून राज्यमंत्र्यांना बरोबर घेऊन दमदाटी करण्याचा प्रयत्न काल (बुधवार) झाला.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना आणि सर्वांनी एक होऊन काम करण्याची अपेक्षा असताना सत्तेच्या अधिकाराचा वापर करणे चुकीचे आहे, हे काही लोकांना समजत नाही, असा टोलाही पत्रकात लगावला आहे. 
 

संधीचा उपयोग रुबाबासाठी नको 
शरद पवार व उद्धव ठाकरे आणि सहकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारची धोरणे व योजना लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे सर्वांनीच मिळालेल्या संधीचा व अधिकाराचा उपयोग रूबाब दाखवण्यापेक्षा जनतेच्या कामासाठी करावा. या संदर्भामध्ये सहकार्य लागल्यास एकत्र येऊन काम करण्याची आमची भूमिका राहील, असे सभापती जगदाळे यांनी पत्रकात नमूद केले आहे. 
 

मंत्र्यांचा इशारा ः आमदार महेश शिंदेंना डावलाल तर...