esakal | काेविड 19 मृत्यूदरात देशात सातारा पाेचला तिसऱ्या क्रमांकावर
sakal

बोलून बातमी शोधा

काेविड 19 मृत्यूदरात देशात सातारा पाेचला तिसऱ्या क्रमांकावर

कोरोना रुग्णसंख्या वाढलेल्या देशातील दहा शहरांमध्ये आता सातारा जिल्ह्याचा समावेश झाला आहे. सप्टेंबरमध्ये दहा हजारांवर रुग्ण सापडलेल्या जिल्ह्यात सातारा देशात नवव्या क्रमांकावर पोचला आहे.

काेविड 19 मृत्यूदरात देशात सातारा पाेचला तिसऱ्या क्रमांकावर

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात झपाट्याने वाढला असून, सप्टेंबर महिन्यात देशातील दहा प्रमुख शहरांत साताऱ्याची नोंद झाली आहे. दहा हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत सातारा देशात नवव्या क्रमांकावर, तर पाचशेपेक्षा जास्त मृत्यू असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत सातारा देशात तिसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती जिल्ह्यात हाताबाहेर गेली असून, शासनाने साताऱ्यात तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सातारा जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर सरासरी दहा रुग्ण सापडण्याचे प्रमाण जिल्ह्यात राहिले होते. पण, मे महिन्यापासून बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण एकदम 70 ते 80 च्या वर गेले होते. तेच प्रमाण सप्टेंबरमध्ये 800 ते 900 वर गेले आहे. मृत्यूचे प्रमाण खूपच कमी होते. सुरवातीला दोन, चार मृत्यू होत होते. पण, आता तीच संख्या दररोज 30 ते 35 च्या घरात गेली आहे. ही आकडेवारी पाहता सातारा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात वाढत्या रुग्णांच्या प्रमाणात उपचाराचे प्रमाणही खूपच कमी आहे. सध्या साताऱ्याचा मृत्यू दर 2.8 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनाला पेलावे लागणार आहे. 

सप्टेंबरमध्ये रुग्णवाढ 117 टक्के 

कोरोना रुग्णसंख्या वाढलेल्या देशातील दहा शहरांमध्ये आता सातारा जिल्ह्याचा समावेश झाला आहे. सप्टेंबरमध्ये दहा हजारांवर रुग्ण सापडलेल्या जिल्ह्यात सातारा देशात नवव्या क्रमांकावर पोचला आहे. जिल्ह्यात 36 हजार 617 बाधित रुग्णसंख्या झाली आहे. रुग्ण वाढण्याचे प्रमाण 117 टक्के आहे. मृत्यचे प्रमाण जिल्ह्यात वाढले असून, सध्या मृतांची संख्या 1096 वर पोचली आहे. याचे प्रमाण 2.8 टक्के असून दररोज 30 ते 35 रुग्ण सापडत आहेत. पाचशेपेक्षा अधिक मृत्यू होण्याच्या देशातील दहा शहरांत सातारा देशात तिसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. त्यामुळे आता शासनाने सातारा जिल्ह्याविषयी गांभीर्याने घेऊन येथे तातडीने उपाययोजना राबविणे आवश्‍यक बनले आहे; अन्यथा आणखी परिस्थिती बिघडण्याची शक्‍यता आहे. 


देशात सातारा कुठे? 

सप्टेंबरमध्ये दहा हजार रुग्णसंख्या झालेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्हे आहेत. यामध्ये नागपूर पाचव्या क्रमांकावर, सांगली सहाव्या क्रमांकावर, तर सातारा नवव्या क्रमांकावर आहे. सप्टेंबरमधील मृत्यूदरवाढीच्या आकडेवारीत महाराष्ट्रातील पाच जिल्हे "टॉप फाइव्ह'मध्ये आहेत. नागपूर पहिल्या स्थानावर, सांगली दुसऱ्या, तर सातारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय नगर चौथ्या, तर कोल्हापूर पाचव्या क्रमांकावर आहे. 

...अशी ही साताऱ्याची तऱ्हा 

 मृत्यूदरवाढीत देशात तिसऱ्या क्रमांकावर
 
 बाधित रुग्ण सापडण्यात देशात नवव्या क्रमांकावर
 
 117 टक्के : रुग्णसंख्येतील सप्टेंबरमधील वाढ
 
 120 टक्के : मृत्यूदरातील सप्टेंबरमधील वाढ
 
 2.8 टक्के : सातारा जिल्ह्याचा मृत्यूदर
 
निविदेमध्येच अडकले जम्बो कोविड सेंटर
 
रेमडिसिव्हरसह जीवरक्षक औषधांचा तुटवडा
 
ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेडसाठी प्रतीक्षा
 
तज्ज्ञ डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांची कमतरता

Edited By : Siddharth Latkar