ऑनलाइन शिक्षणात रयत शिक्षण संस्थेची मुसंडी!

Satara
Satara

सातारा (जि. सातारा) : शाळा सुरू नसल्या म्हणून काय झाले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे नुकसान अजिबात होऊ देणार नाही, असा विडा उचललेल्या रयत शिक्षण संस्थेने ऑनलाइन शिक्षणात आघाडी घेतली असून, संस्थेतील तज्ज्ञ शिक्षक आज पहिली ते बारावी अन्‌ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना धडे देत आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणी मोबाईल रेंज मिळत नाही, अशा 250 विद्यार्थ्यांना 32 जीबीच्या मेमरी कार्डसह टॅब दिलेले आहेत. लवकरच आणखी एक हजार टॅब "आउट ऑफ'रेंज विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत, अशी माहिती "रयत'चे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी दिली. 

एखाद्या युध्दाची तयारी नियोजनबद्धपणे करावी, त्याप्रमाणे संस्थेतील पदाधिकारी आणि तज्ज्ञ शिक्षकांनी तयारी केल्याने केवळ संस्थेच्याच नव्हे तर इतर विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ होत असून,"रयत'ने आपली ऑनलाइन शिक्षणाची सर्व संकेतस्थळे सर्वांसाठी खुली केली आहेत. कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत आणि कधी सुरू होतील, हे कोणी खात्रीने सांगू शकत नाही. यामुळे संस्थेने ऑनलाइन शिक्षणाची युद्धपातळीवर तयारी केली. खरेतर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषय चांगला समजावा, यासाठी गेली काही वर्षे पीपीटी तयार करण्यावर शिक्षकांनी भर दिला होता. त्यामुळे संस्थेच्या संग्रहात विविध विषयांतील शेकडो पीपीटी तयार होत्या आणि ऑनलाइन शिक्षण प्रकल्पाची जबाबदारी तज्ज्ञ विभागीय अधिकारी कमलाकर महामुनी यांच्यावर सोपविली गेली.

श्री. महामुनी यांना संस्थेतील तज्ज्ञ शिक्षक आणि तंत्रज्ञांनी मोलाची साथ दिली. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचे सर्व वर्गाचे धडे वेळेत तयार झाले. शिक्षणाच्या विषयांचे वेळापत्रक केले गेले आणि ते काटेकोरपणे पाळले जाऊ लागले. दुर्गम बामणोलीपासून ते राज्याच्या सर्व भागातील तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना विषयांचे ज्ञान ठरलेल्या वेळी विनाअडचण मिळत आहे. 
दरम्यान, ज्या ठिकाणी मोबाईल रेंज मिळत नाही, अशा सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील 250 विद्यार्थ्यांना प्रत्यकी साडेआठ हजार रुपये किमतीचे 32 जीबीच्या मेमरी कार्डसह टॅब दिले आहेत. लवकरच आणखी एक हजार टॅब "आउट ऑफ रेंज' विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष डॉ. पाटील यांनी दिली. (या टॅबमध्ये आठ ते 15 दिवसांचा प्रोग्रॅम भरला जातो. त्यानंतर टॅब गोळा करून पुढील प्रोग्रॅम भरतात.) 

...असे सुरू आहे ऑनलाइन शिक्षण 

* ऑनलाइन शिक्षणात एक हजार तंत्रस्नेही शिक्षकांचा सहभाग 
* प्रकल्प कार्यप्रणालीसाठी विद्यार्थ्यांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप केले 
* 400 मुख्याध्यापक आणि 5877 शिक्षक सहभागी 
* सर्व विद्यार्थ्यांना ई-कंटेन्ट पीडीएफ फॉर्ममध्ये पाठविला 
* दररोज दोन विषयांच्या गुगल लिंक 
* पॉवर पॉइंट, व्हिडिओचा पुरेसा वापर 
* झुम, गुगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन 
* विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, चित्रकला, शारीरिक शिक्षणाच्याही लिंक दिल्या जातात 
* वेळापत्रकानुसार ऑनलाइन शिक्षण, खंड नाही 
* किती विद्यार्थी सहभागी झाले, याची दररोज माहिती घेऊन कार्यवाही 


""ऑनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना मिळावे, याची काटेकोर दक्षता घेतली जाते. यासाठी सकाळी सहापासून पदाधिकारी यांच्यासह शिक्षक परिश्रम घेत आहेत.'' 
-कमलाकर महामुनी (विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था) 

""संस्थेतील शिक्षकांना आम्ही गेली पाच वर्षे विविध प्रकारचे विषयांचे पीपीटी, व्हिडिओ तयार करण्याचे संगणक प्रशिक्षण देत आहोत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे देण्यात व लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.'' 
-डॉ. अनिल पाटील (कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था) 

संपादन : पांडुरंग बर्गे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com