रस्त्याच्या कामाचा फटका; शेकडो एकर शेती जलमय

अमाेल जाधव
Wednesday, 16 September 2020

कऱ्हाड-तासगाव राष्ट्रीय महामार्गावरील मोऱ्यांची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. पावसानंतर या मोऱ्या तुंबून शेकडो एकर शेती जलमय होते. यंदाही तोच अनुभव आला. 

रेठरे बुद्रुक : कऱ्हाड-तासगाव राष्ट्रीय महामार्गावरील मोऱ्यांची कामे व्यवस्थित न झाल्याने पावसानंतर या मोऱ्या तुंबून शेकडो एकर शेती जलमय होते. गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम दिरंगाईने सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने मोऱ्यांची कामे करताना जादा पाण्याचा विचार न करता बांधकाम केल्याने लोकांना त्रास होत आहे. त्यावर ठोस उपाय शोधावा, अन्यथा परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

गेल्या गुरुवारी (ता. 10) मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वडगाव हवेली, दुशेरे व शेरे परिसरातील शेतशिवारे जलमय होऊन ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. हे पाणी विभागाच्या पूर्वेकडील डोंगर भागातून वाहत आले. कऱ्हाड-तासगाव रस्ता ओलांडून येताना असणाऱ्या मोरींमध्ये जादा झाल्याने ते रस्त्यावरून वाहिले. वडगाव हवेली येथील लेंडोरी नामक ओढा डोंगर उताराकडून वाहत येतो. या ओढ्यास पूर आल्याने सोनारकी नावाच्या शिवारात असणारा कऱ्हाड-तासगाव मार्गावरील फरशी पूल पाण्याखाली गेला. तेथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. अशातच पावसाने तलावातून होणाऱ्या विसर्गामुळे कोटर ओढ्याला पूर आला. ओढ्यालगतच्या धनगर वस्तीतील काही घरांत व कोडोली फाटा-खंडोबा मळा येथील अंगणवाडी इमारतीत ओढ्याचे पाणी घुसून शाळेतील शालेय दप्तर व पोषण आहाराचे साहित्य भिजून नुकसान झाले. 

या दोन्ही ओढ्यांच्या पूरस्थितीमुळे शेकडो एकर शिवार जलमय झाले होते. सोनारकी नावाच्या शिवारातील फरशी पुलाचे तीन वर्षांपासून काम बाकी आहे. लेंडोरी ओढ्याचा प्रवाह कऱ्हाड-तासगाव मार्गावरील गटरामध्ये समाविष्ट केल्याने ओढ्यास आलेल्या पुराची फुग पाठीमागे पसरते व शेकडो हेक्‍टर शेती जलमय होत आहे. फरशी पुलाचे बांधकाम रखडल्याने पूल पाण्याखाली जावून वाहतूक ठप्प होते. 

संपादन ः संजय साळुंखे 

 

साताऱ्यात एक हजारावर गावांना कोरोनाचा विळखा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Road work blows; Hundreds of acers of farmland are waterlogged