लगीनघाई थांबली अन्‌ "त्यांच' गणितच बिघडल!

patan
patan

मल्हारपेठ (जि. सातारा) ः संचारबंदीचा बॅंड-बॅंजो, मंगल कार्यालय मालकांस मोठा आर्थिक फटका बसला आहे. लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले. ऐन लग्नसराईत लॉकडाउनचा तडाखा बसल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव, नवरात्र उत्सवावरही संचारबंदीची टांगती तलवार राहणार असल्यामुळे बॅंड-बॅजो मालकांचे आणखी आर्थिक नुकसान होऊ शकते. संचारबंदीचा फटका लगीनघाईला बसला आहे. 

तुळसी विवाहानंतर विवाह मुहूर्ताची लगबग सुरू होते, ती अगदी जूनच्या अखेरीस समाप्त होते. तब्बल आठ महिने ही लगीनघाई दिसून येते. या लगीनघाईवर अनेकांचे व्यवसाय अवलंबून असतात. अलीकडे विवाह समारंभाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. लग्न ठरल्यापासून ते गोंधळापर्यंत कार्यक्रमांची अक्षरशः रेलचेल असते. या विवाह समारंभावर व्यवसाय करणारांची चांगली चलती चालते. बॅंड वाजंत्रीपासून ते कपडालत्ता, बाजारहाट, घोडा, बग्गी ते मंगल कार्यालय, मंडप डेकोरेटर्सपासून ते अगदी ब्राह्मण, जागर, गोंधळ घालणाऱ्यापर्यंत असा सगळा लवाजमा या लग्न समारंभावर अवलंबून असतो. मात्र, यावर्षी लॉकडाउनमुळे लगीनघाईवर अबलंबून असणारांचे गणितच बिघडले आहे. 

पाटण तालुक्‍यात अंदाजे लहान-मोठी 100 मंगल कार्यालये आणि 100 ते 120 बॅंड-बॅंजो पथके आहेत. या कलाकारांना करार पद्धतीने मानधन दिले जाते. यावर्षी करार व्हायच्या अगोदरच काही कलाकारांना संचारबंदीमुळे घरी बसावे लागले आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. एका बॅंड-बॅंजो पथकात 20 ते 25 कलाकार काम करतात. मंगल कार्यालयाच्या केटरिंग व्यवसायात 40 ते 50 महिला-पुरुष कामगारांना काम मिळते. लग्नसमारंभ नसल्याने या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगारांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. मंडप व्यावसायिकांचे लाखो रुपये किमतीचे साहित्य धूळखात पडले आहे. कायमच बंदीच्या कचाट्यात सापडलेला डीजे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवापर्यंतही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असू शकतो. त्यामुळे यावर्षीच्या सर्व सण, उत्सवांवर संचारबंदीचे निर्बंध राहतील. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. 


माझ्याकडे असलेल्या 25 कलाकारांवर काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आम्हा व्यावसायिकांनाही काही तरी मदत देण्यासाठी प्रयत्न करावा. बॅंकांचे कर्ज काढून व्यवसाय उभे केले आहेत. कामच मिळाले नाही, हे संकट असच पुढं राहिले तर अनेक पथके बंद पडतील. 

- रामचंद्र जाधव, जिल्हाध्यक्ष, कलाकार महासंघ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com