सांगलीतील पूर राेखण्यासाठी 'या' उपाययाेजना शक्य; मंत्री शंभूराज यांच्या आराेपानंतर वडनेरेंचा खूलासा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

पाणी पातळी मर्यादित ठेवण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग सुरू झाल्यावर स्थिती लक्षात घेऊन संबंधित दोन योजनांनी पाणी उचलले पाहिजे, असे नंदकुमार वडनेरे यांनी नमूद केले.

कऱ्हाड : वडनेरे समितीच्या अहवालात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील पुराची कारणमिमांसा केली आहे. मात्र, सांगलीला जो पूर येतो त्याचे महत्त्वाचे कारण कऱ्हाडातून येणारे पाणी आहे. कोयना धरणातून एक ते सव्वा लाख क्‍युसेकपर्यंत होणारा विसर्ग, पावसाचे पाणी आणि कृष्णा नदीच्या पाण्याची पडणारी भर यामुळे कऱ्हाडला पूर येतो. ही वस्तुस्थिती असताना वडनेरे समिताने त्याचा काहीच उल्लेख अहवालात केलेला नाही, असा आरोप गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जलसंपदामंत्र्यांसमोर केला.
 
सातारा, सांगली व कोल्हापूरला येणाऱ्या महापुराच्या पार्श्‍वभूमीवर वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये गृहराज्यमंत्री देसाई यांनी हा आरोप केला. खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री बंटी पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह तिन्ही जिल्ह्यांचे लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी उपस्थित होते.
 
मंत्री देसाई म्हणाले, ""सांगलीला येणारा पूर कऱ्हाडच्या पाण्यामुळे आहे. कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर होणारा विसर्ग आणि पाऊस यामुळे कोयनानगरपासून कऱ्हाडपर्यंत नदीपात्र सोडून गावात पाणी शिरते. कोयनेचे पाण्यात साताऱ्याकडून येणारे कृष्णा नदीचे पाणी मिसळल्यावर कऱ्हाडात पूरस्थिती निर्माण होते. ही वस्तुस्थिती असताना वडनेरे समिताने त्याचा काहीच उल्लेख अहवालात केलेला नाही. ते पाणी कसे कमी करायचे, धरणातील पाणी पातळी कशी मर्यादित ठेवायची, यावर विचार करणे गरजेचे आहे.'' 

आरोपांबाबत समितीचाही खुलासा 

मंत्री देसाई यांच्या आरोपांवर खुलासा करताना समितीचे प्रमुख श्री. वडनेरे यांनी यावर्षी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन वेगळ्या पद्धतीने प्रस्ताविक केले असल्याचे सांगितले. यंदा धरणात गेल्या वर्षीपेक्षा 15 टीएमसी पाणी जास्त आहे, तर जून महिन्यातील पहिल्या 20 दिवसांची पावसाची आकडेवारी पाहिल्यास धरण परिसरात झालेला पाऊस गेल्या वर्षीपेक्षा पाचपट जादा आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचा प्रश्‍न आहेच. त्याचबरोबर ताकारी आणि टेंभू या मोठ्या उपसा सिंचन योजना जूनपर्यंतच चालवल्या जातात. पाणी पातळी मर्यादित ठेवण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग सुरू झाल्यावर स्थिती लक्षात घेऊन संबंधित दोन योजनांनी पाणी उचलले पाहिजे, असे सांगितले. त्यावर जलसंपदामंत्री पाटील यांनीही या वेळी संबंधित मुद्द्यांचा अहवालात समावेश करण्याची गरज असल्याचे मत व्यक्‍त केले.

अलमट्टीचा संबंध नाहीच , नदी पात्रांच्या अवैध वापरावर रोख लावा : वडनेरे

महापुराचा सामना करण्यासाठी नऊ बोटी सज्ज, वाचा कुठे?

महापूरप्रश्‍नी ठाकरे-येडियुरप्पांना भेटणार; हे धोरण ठरवणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Sangli Flood Can Be Control Says Vadnere Commiittee