सातारा जिल्ह्यात हळद प्रक्रिया लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या महामारीची सर्वच क्षेत्रांना झळ बसल्याचे दिसते. शेती विभागही त्याला अपवाद नाही. इंधनासह मजूरांअभावी शेतीतील कामे खोळंबली होती. मात्र, लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथीलता मिळाल्याने आता शेतातील लगबग सुरू झाली आहे. तरीही लॉकडाउनमुळे हळदीवर केली जाणारी प्रक्रीया लांबणीवर पडली आहे. 
 

गोडोली (जि. सातारा) ः गेल्या 52 दिवसांपासून कोरोनाच्या भीतीमुळे शिवारात चालणारी नेहमीची धावपळ अल्पशा प्रमाणात सध्या दिसत आहे. उशिराच्या लागणीची हळद काढणी, शिजवणे व वाळवण्यासह पॉलिश करण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आगाप लागणीचा माल तयार असून बाजारपेठेत हळदीचे वायदे मोठ्या प्रमाणात होत नाहीत. दरही नेहमीप्रमाणे मिळत नसल्याने हळद उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या यंत्राच्या मदतीने ड्रमच्या साह्याने हळदीला पॉलिश करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

किन्हई, अंबवडे (संमत कोरेगाव), हिवरे, भाडळे खोऱ्यात ही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. साधारणतः जिल्ह्यात "सेलम' जातीचा वाण सर्वत्र अक्षयतृतीयेला लावण्याचा आग्रह शेतकरी करतात. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नसते तेथील शेतकरी जून-जुलैपर्यंत सरी पद्धतीने लागण करतात. मागील हंगामात उशिराची लागण जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाली. शेतकऱ्यांनी एकरी दीड लाखांपर्यंत भांडवली खर्च केला. मात्र, थंडीमुळे व करपा रोगामुळे हळदीच्या गंड्याची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. फेब्रुवारी, मार्चमध्ये खांदणीची कामे असतात. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हळद खांदणीची कामे झाली. मात्र, लॉकडाउन जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना घरगुती हळद खांदणी करावी लागली. नंतरच्या काळात हळद शिजवणे व पॉलिशसाठी लागणारी यंत्रणा मिळेनाशी झाली. 

सध्या डिझेल, पेट्रोल व कामगार मिळू लागल्याने 500 ते 700 रुपये दराने एक ड्रम पॉलिश करून मिळतो. पॉलिशचे काम शेतातच करावे लागत आहे. एका ड्रमसाठी तासभर वेळ लागतो. तयार झालेल्या हळदीला दर पाच ते आठ हजारांपर्यंत मिळत असल्याने उत्पन्नाचा होणारा खर्च मिळत नाही. त्यामुळे भांडवली खर्च करूनही हातात चार पैसे मिळत नाहीत. त्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित दर शासनाने बांधून द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचे हळद उत्पादक जयवंत बोडके, सुधीर होळ यांनी बोलून दाखविले. नव्या लागणीसाठी गंडे निवडण्याचे कामही सध्या शेतकऱ्यांना घरगुती करावे लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Satara distick Prolonged processing of turmeric