खदखद राज्य सरकारमध्ये, खलबते कऱ्हाडमध्ये?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

राज्य सरकारमधील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसमधून सध्या उघडपणे नाराजीची भावना व्यक्‍त होत आहे. त्यामुळे सरकारमधील खदखद आता चव्हाट्यावर आली असून, त्याच पार्श्‍वभूमीवर आज कऱ्हाडात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख, शहरी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची झालेली बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे खदखद सरकारमध्ये अन्‌ खलबते प्रत्यक्षपणे सरकारमध्ये सहभागी नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांच्या कऱ्हाडमध्ये अशी स्थिती आज पाहायला मिळाली. 

कऱ्हाड (जि. सातारा) : राज्य सरकारमधील अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन्ही मंत्र्यांनी आज पृथ्वीराज चव्हाण यांची घेतलेली भेट सध्याची राजकीय स्थिती पाहता महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारमधील कॉंग्रेसच्या भूमिकेबद्दल मंत्री सुनील केदार यांच्या मुंबई येथील बंगल्यात काही निवडक मंत्री व कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीला मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील उपस्थित होते. त्यामुळे तिघांच्या तासभर झालेल्या गुप्त, कमरांबद बैठकीत त्याविषयीच चर्चा झाल्याचा अंदाज आहे. मात्र, तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. 

मंत्री देशमुख यांचा आज सांगली दौरा होता, तर मंत्री पाटील पुण्याच्या दौऱ्यावर होते. दोघांनीही एकमेकांशी फोनवर संपर्क साधला अन्‌ दोघेही आमदार चव्हाण यांची भेट घेण्यास आले. पाचच्या सुमारास आमदार चव्हाण यांच्या पाटण कॉलनी येथील निवासस्थानी दोघेही आले. त्या तिघांची भेट झाली. आमदार चव्हाण यांच्यासोबत तब्बल तासभर दोघांनी बैठक केली. त्या तिघांव्यतिरिक्त बैठकीत कोणालाच प्रवेश नव्हता. त्यामुळे राज्यातील राजकीय स्थितीवर त्यांची सविस्तर चर्चा झाली, की वाढत्या कोविड प्रादुर्भावावर काय करता येईल, यावर ते बोलले याची ठोस माहिती उपलब्ध झाली नाही. आमदार चव्हाण यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत नक्की चर्चा कोणत्या विषयावर झाली, याची माहिती देण्यास तिघांनी नकार दिला. 

चर्चा कोविडसंदर्भात..! 
दरम्यान, यासंदर्भात "सकाळ'शी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, ""मंत्री अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते आहे. त्यामुळे मोठ्या शहरातील हॉस्पिटल व तेथील कोविड रुग्णांची माहिती त्यांच्याकडे आहे. त्या अनुषंगाने वाढता प्रादुर्भाव व त्यावरील उपायांबाबत सविस्तर चर्चा झाली. मंत्री देशमुख सांगली दौऱ्यावर आहेत, तर मंत्री पाटील पुण्याला निघाले होते. दोघेही अचनाक आले. मंत्री देशमुख यांचा सातारा दौरा दोन दिवसांनंतर आहे. त्या वेळी ते जिल्ह्याचा आढावा घेतील; परंतु आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.'' 

शिवेंद्रसिंहराजे संतापले, सातार्‍यात आधीच अडचणी आहेत त्यात...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Secret Meeting Of Congress Ministers In Karad