
Satara : साताऱ्यात आमदार, खासदार गट समोरासमोर
सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आमदार गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सध्या शहरातील विकासकामांवरून कलगीतुरा रंगला आहे. त्याचे पडसाद बाजार समितीच्या निवडणुकीत उमटणार आहेत.
आमदार गटाने कोणत्याही परिस्थितीत खासदार गटाला बाजार समितीत शिरकाव करू न देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या वेळी बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही राजांचे समर्थक समोरासमोर भिडणार असल्याचे चित्र आहे.
सातारा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सध्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार टोलेबाजी रंगली आहे.
त्यामुळे पालिका निवडणुकीत उदयनराजेंची सातारा विकास आघाडी विरुद्ध शिवेंद्रसिंहराजेंची नगर विकास आघाडी आणि भाजप अशी लढत होणार हे निश्चित आहे. यातूनच पालिका हद्दीतील विकासकामांवरून दोघांत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचे पडसाद सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत.
त्यामुळे आमदार गटाने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मागील वेळी खासदार उदयनराजेंच्या गटाचे सात संचालक होते; पण त्यांनी तक्रार अर्ज देऊन राजीनामे दिले होते. त्याच्या आधीच्या पंचवार्षिक निवडणुकीत खासदार गटाचे पाच संचालक निवडून आले होते. आमदार गटाचे सध्या ११ संचालक होते. आता यावेळेस सर्वच्या सर्व १८ जागांवर आमदार गट लढणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. आमदार गटाकडे सोसायटीचेच १७०० मतदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बाजार समितीत मनोमिलन होणार नाही. परिणामी, दोन्ही राजांच्या समर्थकांची पॅनेल एकमेकांविरोधात भिडणार आहेत. लवकरच मतदारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. त्यामध्ये मतदारांची नेमकी संख्या समजणार आहे.