सातारा : दोन दानपेट्यांवर चोरट्यांचा डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief

सातारा : दोन दानपेट्यांवर चोरट्यांचा डल्ला

ढेबेवाडी : साबळेवाडी (ता. पाटण) येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरातील दोन दानपेट्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना काल रात्री घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून, चोरट्यांनी रिकाम्या केलेल्या दानपेट्या जवळच्याच डोंगरातील अन्य एका मंदिरात आढळून आल्या आहेत.

ढेबेवाडी- पाटण मार्गावरील साबळेवाडी येथे रस्त्यालगतच श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर असून, तेथूनच घाटमार्ग सुरू होतो. काल रात्री मंदिरात सप्त धेनू पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम होता. साडेदहाच्या सुमारास तो संपल्यानंतर भाविक आपापल्या घरी परतले. चोरट्यांनी संधी साधून रात्री उशिरा मंदिराच्या प्राथमिक शाळेकडील बाजूच्या भिंतीचे स्टीलचे ग्रील तोडून मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील साखळीने बांधलेल्या दोन दानपेट्या घेऊन पोबारा केला.

सकाळी नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आलेल्या पुजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनाही कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मंदिराजवळ चिखलात दुचाकीच्या टायरचे व्रण आढळून आल्याने चोरटे दुचाकीवरून आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळापासून जवळच असलेल्या दिवशी घाटमार्गवरील श्री वाघजाई मंदिर परिसरात चोरट्यांनी रिकाम्या करून टाकलेल्या दानपेट्या आढळून आल्या.

थोडी चिल्लर त्यातच सोडून चोरट्यांनी आतील नोटा लंपास केल्याचे आढळून आले. सरपंच निवास साबळे, पोलिस पाटील बाळासाहेब साबळे, आनंद साबळे म्हणाले, ‘‘मंदिरात संकष्टी चतुर्थी व इतर दिवशीही दर्शनासाठी भाविकांची वर्दळ असते. दानपेट्या सात- आठ महिन्यांपासून उघडलेल्या नव्हत्या. त्यामुळे चोरीला गेलेली रक्कम जास्त असल्याची शक्यता आहे. यापूर्वी गावातील पितळी घंटा चोरट्यांनी पळवून नेल्याच्या घटना घडलेल्या होत्या. आता त्यांनी दानपेट्या लंपास केल्याने ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण आहे.’’

Web Title: Satara Sri Siddhivinayak Temple Sablewadi Thieves Donation Boxes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..