सातारा : ST ला अडचणीतून मार्गावर आणणारे ६५ जण कामावरून कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

सातारा : ST ला अडचणीतून मार्गावर आणणारे ६५ जण कामावरून कमी

सातारा : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुमारे सहा महिन्यांहून अधिक काळ संप केला होता. एसटी कामगारांच्या या संप काळात एसटीची धुरा सांभाळून तिला मार्गावर आणणाऱ्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने कामावरून कमी केले आहे. यात सातारा विभागातील सुमारे ६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी २७ ऑक्टोबर २०२१ पासून संप पुकारला होता. या काळात प्रवासी वाहतूक सुरळीत राहण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचा संप चिरडून टाकण्यासाठी महामंडळाने टप्‍प्याटप्‍प्याने राज्यभरात ८०० कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली होती. त्यानंतर राज्य सरकारने संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांच्या ४१ टक्के पगारवाढ करून आणखी काही मागण्या मान्य केल्या. तरीही एसटीतील काही संघटनांनी संप सुरूच ठेवला. या काळात संपामध्ये काही राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतल्याने संपाला वेगळे वळण लागले

होते. त्यामुळे राज्य सरकार उच्च न्यायालयात गेल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले. त्यामुळे एप्रिल २०२२ मध्ये कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. त्यावेळी कंत्राटी चालकांना मुदतवाढ देण्यात आलेली होती. परंतु, आता शंभर टक्के नियमित कर्मचारी हजर झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, एसटी महामंडळात अनेक ठिकाणी पदे न भरल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळानेही आता नव्याने भरती करून कमी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. एसटीच्या पडत्या काळात एसटीला साथ दिलेल्या या कंत्राटी चालकांवर ऐन गणेशोत्सवात बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. प्रवाशांना चांगली सेवा देऊनही कमी केल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.

गरज सरो अन् वैद्य मरो...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात सुमारे दोन ते तीन महिने वाहतूक सेवा बंद होती. त्या काळात महामंडळाने विभागनिहाय कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करून एसटी सेवा सुरळीत केली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून संप काळातील नियमित कर्मचारी कामावर हजर झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. या प्रकारामुळे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे महामंडळाची वागणूक असल्याची सामान्यांत चर्चा आहे.

Web Title: Satara St Contracts Work65 People Who Brought

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..