Satara: मुंबईला हजार; पुण्याला ४०० रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


एसटीच्या संपामुळे खासगी वाहनचालकांची मनमानी; प्रवाशांची आर्थिक लूट सुरू

सातारा : मुंबईला हजार; पुण्याला ४०० रुपये

सातारा : गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाचा गैरफायदा घेत खासगी वाहनचालकांनी प्रवाशांना लुटण्याचा धंदा सुरू केला आहे. सातारा-मुंबई एक हजार, तर सातारहून पुण्याला जाण्यासाठी ४०० रुपये आकारत खासगी वाहनचालक दिवाळी साजरी करताना दिसत आहेत.

राज्यभरात एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे, राज्यभरासह जिल्ह्यातील अकरा आगार ओस पडलेले आहेत. या संपात बहुतांशी कर्मचारी सहभागी झाल्याने सर्वच कामकाज ठप्प झाले आहे. ऐन दिवाळीची सुटी संपत असताना प्रवाशांची गावी जाण्यासाठी गर्दी झाली आहे. या गर्दीचा फायदा उठवत खासगी वाहनचालकांनी प्रवाशांचे खिसे कापण्यास सुरुवात केली आहे. गेंड्याची कातडी घातलेल्या खासगी वाहनचालकांनी मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची आर्थिक लूट करण्यास सुरवात केली आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

दरम्यान, ऐन दिवाळीच्या हंगामात एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात बस उभ्या आहेत. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राज्य सरकारने खासगी वाहनचालकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे, मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर खासगी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सद्यःस्थितीत प्रवाशांची गर्दी असल्याने खासगी वाहनचालकही फायदा उठवीत आहेत.

प्रवाशांना बाहेरगावी जाण्यासाठी खासगी वाहनांशिवाय दुसरा पर्याय नसल्याने वाहनचालक सांगतील तेवढे पैसे देणे भाग पडत आहे. सातारा-मुंबई प्रवासासाठी एसटीला ५४० रुपये तिकीट दर असताना खासगी वाहने एक हजार तिकीट घेत आहेत. तसेच, सातारा-पुणे मार्गासाठी १५० तिकीट असताना ३०० ते ४०० रुपये तिकीट आकारले जात आहे.

आरटीओ कार्यालयाकडून कारवाईची अपेक्षा

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने खासगी वाहनचालकांनी मनमानी पद्धतीने दर लागू केले आहेत. या तिकीट दरावर नियंत्रण ठेवण्याची आवश्‍यकता आहे. मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर खासगी वाहने प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत. या वाहनचालकांवर आरटीओ विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.

loading image
go to top